संग्राम वाघमारे
चाकूर : तालुक्यात शेतकऱ्यांने मोठ्या आशेने तुती लागवड केली. परंतु तुती लागवडीला एक वर्ष पूर्ण होऊनही रेशीम विभागाकडून अद्याप नोंदणी व अनुदान मिळालेले नसल्याने शेतकरी हतबल होऊन त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
चाकूर तालुक्यातील 25 शेतकऱ्यांचे 1 कोटी 8 लाख सहा हजार रुपये अनुदान रखडल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षाचे प्रश्न निकाली न काढताच शासनाने पुढील वर्षाच्या नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
तालुक्यातील सुमारे 25 शेतकऱ्यांनी शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, महारेशीम अभियान-2025, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व सिल्क समग्र-2 अंतर्गत शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रेशीम लागवड केली. त्या शेतकऱ्यांना 20 ऑगस्ट 2025 रोजी तहसील कार्यालयातून तहसीलदार यांच्या आदेशाने कार्यारंभ आदेश काढण्यात आले.तालुक्यातील आठ गावांतील 25 शेतकऱ्याचा यामध्ये समावेश आहे.
वर्ष उलटून गेले मात्र प्रत्येकी शेतकरी 4 लाख 32 हजार 240 प्रमाणे प्रशासकीय मान्यता रक्कम अनुदान अद्याप मिळाले नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा अडचणींचा डोंगर उभा राहिला असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तालुक्यातील तुती लागवड करण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी त्यासाठी स्वतःच्या खर्चातून शेतात आवश्यक सुविधा उभारल्या, मेहनत घेतली. मात्र, लागवड झाल्यानंतर नोंदणीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने शेतकरी आजही अनुदानापासून वंचित राहिला आहे.
तालुक्यातील तुती लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधून पाठपुरावा केला, तरीही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कागदोपत्री प्रक्रिया रखडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण वाढली असून शासनाच्या योजनांवरील विश्वासही दिवसेंदिवस उडत चालल्याचे तालुक्यातील शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.
दरम्यान, मागील वर्षी लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असताना नवीन वर्षासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे, ही बाब संतापजनक असल्याची उलटसुलट प्रतिक्रिया शेतकऱ्यातून उमटत आहे. संबंधित प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन प्रलंबित नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी आणि रखडलेले अनुदान वितरित करावे, अशी मागणी तालुक्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.
चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तुती लागवड केली आहे. त्यांना अनुदान मिळण्यासाठी कार्यारंभ आदेश निघाले आहेत. तहसील कार्यालय स्तरावर या योजनेचे काम करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नाही. आम्ही लवकरात लवकर अनुदान मिळण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करीत आहोत. शेतकऱ्यांना लवकरच अनुदान मिळेल.एस. बी. वराट रेशीम विकास अधिकारी, लातूर
मी माझ्या शेतात दीड एकरात रब्बी आणि खरिपाचे पीक न घेता लाख रुपये खर्च करून तुती लागवड केली आहे. वर्ष झाले अद्याप शासनाकडून अनुदान मिळाले नाही. अनुदानाचा विषय काढला की, मिळेल असा शब्द संबंधिताकडून वारंवार ऐकायला मिळत आहे.या वर्षात अनुदान प्राप्त झाले ठीक नाही तर नव्याने नोंदणी करण्याची वेळ आल्यास सर्व मेहनत, खर्च, उत्पन्न पाण्यात जाणार आहे.सिद्धेश्वर बद्दे, शेतकरी, तुती लागवड, तिवटघाळ