एसटी महामंडळातर्फे विद्यार्थ्यांना मिळणार ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड pudhari photo
लातूर

Student Smart Card : एसटी महामंडळातर्फे विद्यार्थ्यांना मिळणार ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड

आधार संलग्न 'सरल' व 'अपार' क्रमांक अनिवार्य; नोंदणीसाठी विभाग नियंत्रकांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

लातूर : राज्य परिवहन महामंडळातर्फे विविध सामाजिक घटकांना प्रवास भाड्यात देण्यात येणाऱ्या सवलतींसाठी आता आधारकार्ड संलग्न ‘एनसीएमसी अनेब्ल्ड स्मार्ट कार्ड’ वितरीत करण्यात येत आहे. लवकरच शालेय व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या पासेसकरिताही या कार्डची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

शासनाच्या ९ ऑक्टोबर २०१८ च्या निर्णयानुसार सवलतधारी प्रवाशांना स्मार्ट कार्ड देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळ, मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि एनएसडीएल पेमेंट्स बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्ड देण्याची कार्यवाही सर्व आगारांमध्ये सुरू आहे. १६ फेब्रुवारी २०२६ पासून अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारी प्रवाशांसाठी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, याच धर्तीवर आता नजीकच्या काळात विद्यार्थ्यांनाही हे स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे.

शालेय, शैक्षणिक, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ‘सरल’ व ‘अपार’ क्रमांक संलग्न एनसीएमसी कार्ड प्राप्त होणार आहे. यासाठी हे दोन्ही क्रमांक विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेले असणे अनिवार्य आहे. शालेय विद्यार्थ्यांना मासिक पासाकरिता लागणाऱ्या या स्मार्ट कार्डचा मागणी अर्ज एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या अर्जात नमूद केलेली माहिती व जोडलेली आवश्यक कागदपत्रे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक असून, त्यानंतरच हा अर्ज आगारातील किंवा बसस्थानकावरील वाहतूक नियंत्रक अथवा अधिकृत एजंट यांच्याकडे जमा करावयाचा आहे.

या कार्डच्या नोंदणी प्रक्रियेसाठी विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांचा चालू मोबाईल (भ्रमणध्वनी) क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. अर्जाची तपासणी व पडताळणी झाल्यानंतर आवश्यक शुल्क आकारून विद्यार्थ्यांना पावती दिली जाईल. नोंदणी पूर्ण झालेले हे एनसीएमसी कार्ड ३० दिवसांच्या आत प्रिंट करून संबंधित आगारास प्राप्त होईल आणि त्यानंतर आगारामध्ये पॉस (पीओएस) मशिनद्वारे हे कार्ड ॲक्टिव्ह करून ते प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना वितरित केले जाईल.

तरी सर्व संबंधित विद्यार्थी आणि पालकांनी नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची आगाऊ पूर्तता करून ठेवावी, असे आवाहन लातूर राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभाग नियंत्रकांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT