Massive fire breaks out in running bus
औसा, पुढारी वृत्तसेवा : औसा शहरातून लातूरकडे जाणाऱ्या एका खाजगी बसला १५ ऑगस्ट रोजी अचानक आग लागली आणि काही मिनिटांत बस पूर्णपणे जळून खाक झाली. वेळेवर सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याने अनर्थ टळला. औसा शहरातील नागपूर - रत्नागिरी महामार्गांवर ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोटस ट्रॅव्हल्सची खाजगी बस पुण्याहून रात्री १० वाजता लातूरकडे निघाली होती. बसमध्ये ४० ते ४५ प्रवासी होते. १५ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजता बस औसाच्या हाश्मी चौकात पोहोचली, तेव्हा टायर फुटला आणि आग लागली.
हे पाहताच चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ बस थांबवली. त्यानंतर सर्व प्रवासी, चालक बाहेर काढण्यात आले. प्रवासी बाहेर पडताच आगीने संपूर्ण बसला वेढले. बसमधून मोठमोठ्या ज्वाळा उठू लागल्या. सर्व प्रवासी, चालक आणि कंडक्टर जळत्या बसपासून दूर गेले. घटनास्थळी असलेल्या लोकांनी औसा नगर परिषद आणि पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
दलालाही औसा अग्निशमन कळवण्यात आले. पथकाने आग आटोक्यात आणली, पण तोपर्यंत वस पूर्णपणे जळून खाक झाली होती. रस्त्यात बस पेटल्यामुळे वाहतुकीतही अडथळा निर्माण झाला. जवळपास एक तास वाहतूक विस्कळीत राहिल्यानंतर सकाळी १० वाजता पोलिसांनी पुन्हा वाहतूक सुरू केली.