निलंगा/प्रतिनिधी: निलंगा तालुक्यातील मसलगा पाटीवर दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी ५ वाजता कर्नाटक पासींगच्या ट्रकचा ( केए - ३५ सी- ९८४५) भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा जागेवर मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला.
लातूर जहिराबाद हायवेवर निलंगा तालुक्यातील मसलगा पाटीवर बस्वकल्याण वरून लातुरच्या दिशेने सौर उर्जेचे लोखंडी अँगल घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रोडवरून खाली गेला. ट्रकमधील लोखंडी अँगल केबिनवर आल्याने केबीनचा चुराडा झाला व केबीन मधील दोघांचा जागेवर मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. घटना घडताच मसलगा येथील ग्रामस्थांनी जेसीबी च्या सहाय्याने अँगल बाजूला करून तिघांना बाहेर काढून रुग्णवाहीकेतून रूग्णालयात पाठवले. यावेळी नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती. निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर सुर्यवंशी, पोलीस जमादार सुनील पाटील आदीसह घटनास्थळी येऊन पाहणी केली. व घटनेची नागरिकांकडून माहिती घेतली. तसेच रोडवरील वाहतूक सुरळीत केली.