Manthan Konale Selection Navy Lieutenant
देवणी : महाराष्ट्र - कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या देवणी तालुक्यातील विजयनगर येथील मंथन अंकुश कोनाळे याची नौदलात सब लेफ्टनंटपदी निवड झाली. तालुक्यात लेफ्टनंट होण्याचा पहिला मान मंथन यांने मिळवला आहे. त्याबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. तर आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
मंथन चे आजोबा हे एक सामान्य शेतकरी होते. त्यांनी आपल्या मुलाला शिक्षक बनविले. पण नातवाने मोठा अधिकारी व्हावे. ही त्यांची इच्छा होती. मंथन हा सुवर्णा व अंकुश दादाराव कोनाळे यांचा मुलगा. तो लहानपणापासूनच हुशार होता. त्याचे प्राथमिक शिक्षण निलंगा येथील लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात झाले. त्यानंतर मंथनची सातारा सैनिक स्कूलमध्ये निवड झाली. सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण येथे झाले. त्यानंतर त्याने बीटेक डिग्री पूर्ण केली.
बारावीनंतर यूपीएससी मार्फत एनडीए परीक्षा देऊन त्याची निवड झाली. भारतीय नौदल अकॅडमी इजिमला (केरळ) येथे ३१ मेरोजी १०७ ए दीक्षांत समारंभ झाला. यावेळी मंथन कोनाळे यांना सब लेफ्टनंट ही पदवी बहाल करण्यात आली. यावेळी उपस्थित कुटुंबियांना भारावून आले. चार वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर तो देशसेवेसाठी सज्ज झाला आहे.
दीक्षांत समारंभाचे साक्षीदार माझे आई- वडील व मामा होते. त्याचबरोबर माझ्या आजोबांचे स्वप्न सार्थक झाले आहे, असे भावूक उद्गागार मंथनने 'दै. पुढारी' शी बोलताना काढले.