male staff use girls' toilets, in ZP girls' schools
उदगीर, पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील वाढवणा (बु.) येथील ३४० मुलींची पटसंख्या असलेल्या पहिली ते दहावीपर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत स्वच्छतागृह एकच अन् त्यात कर्मचाऱ्यांचा वावर होत असल्याने संताप व्यक्त केले जात आहे.
वाढवणा (बु.) येथे मुलींची पहिली ते दहावी वी पर्यन्तची जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेत सद्यस्थितीत ३४० इतकी पटसंख्या आहे. या शाळेत पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या ६० ते ७० टक्के आहे. ३४० मुली व ६ ते ७ महिला शिक्षिकांसाठी फक्त एकच स्वछतागृहाची सुविधा आहे. स्वछतागृहाची कडी नसणे, दरवाजा न लागणे, पुरेसे पाणी नसणे, इत्यादी प्रचंड अशी दयनीय अवस्था झालेली आहे.
एखाद्या मुलीला बाथरूमसाठी जायचे असेल तर अक्षरशः दुसऱ्या मुलीला सुरक्षितता म्हणून बाहेर दरवाजाजवळ थांबवावे लागते. यातून कहर म्हणजे पुरुष कर्मचारीही या मुलींसाठी असलेल्या स्वच्छ्तागृहाचा बिनदिक्कतपणे सर्रास वापर करत असतात. प्रचंड अस्वच्छ्ता आणि वॉशरुमला जावे लागते या गोष्टीमुळे बऱ्याच मुली भिऊन पाणीच पीत नाहीत.
परिणामी पाणी कमी पिल्यामुळे किंवा बाथरूम जावे लागेल या भीतीपोटी, ती पोटात कोंडवल्यामुळे बऱ्याच मुलींना पोटदुखी, मुतखडा, अस्वस्थ वाटणे इत्यादी आजाराला तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेऊन स्वच्छतागृहाची दुरुस्ती व देखभाल करून, आणखी एक स्वच्छतागृह उपलब्ध करून देऊन मुली व महिला कर्मचारी यांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी होत आहे.
मागील मुख्याध्यापकांच्या काळापासून मुलींच्या स्वच्छ्तागृहाची प्रचंड अशी दयनीय अवस्था चालत आलेली आहे. शाळेला मिळणारा निधी जातो कुठे व शाळा तपासणीसाठी आलेल्या गटशिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनाला ही गोष्ट आजपर्यंत का आलेली नाही आणि का येत नाही? असा सवाल पालक वर्गातून केला जात आहे.
वाढवणा (बु.) कन्या शाळेत जागेअभावी स्वच्छतागृह एकच आहे. परिणामी पटसंख्या अधिक आणि स्वच्छतागृह एक हा खूप मोठा अडचणीचा विषय आहे. स्वच्छतागृहाच्या संख्येत वाढ करायची असेल तर एक वर्ग बंद करून त्या ठिकाणी स्वच्छतागृह तयार करावे लागणार आहे. त्यामुळे तेथील स्वच्छतागृहाचा विषय प्रलंबित आहे. तसेच तेथून जवळच जि.प मुलांची शाळा आहे. तेथील प्रांगणात मुलींसाठी स्वच्छतागृह बांधता येईल मात्र या दोन्ही शाळेच्यामध्ये रोड आहे. मुलींना पायी जाणे -येणे कठीण होणार आहे. स्वच्छतागृह बांधण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. मात्र जागेअभावी स्वच्छतागृहाचे काम रखडले आहे.- शफीक शेख, गटशिक्षणाधिकारी उदगीर,