संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सज्ज राहावे pudhari photo
लातूर

Shivendrasinhraje Bhosale : संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सज्ज राहावे

पुनर्भरण मोहीम हाती घ्यावी : पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

पुढारी वृत्तसेवा

लातूर : आगामी मॉन्सून कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला जात असल्याने जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले आहेत. पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, गळती रोखणे आणि उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरयुक्त वापर करण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. बैठकीत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती होती. तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषा पाटील तळेगावकर, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, मनपा आयुक्त मानसी मीना, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, लातूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता रुपाली ठोंबरे, कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

भोसले यांनी सांगितले की, पाणी टंचाईची तीव्रता सध्या कमी असली तरी काही गावांमध्ये तातडीने उपाययोजना आवश्यक आहेत. त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि विहीर पुनर्भरण मोहिम हाती घेणे गरजेचे आहे. बंधारे, तलावातील गाळ उपसा करणे आणि पाणी पुरवठा योजना सुधारण्यात प्राधान्य देणे आवश्यक आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, चाकूर, चापोली, हाडोळती, किनगावसारख्या अपूर्ण पाणी पुरवठा योजनेला गती देणे आवश्यक आहे. पाणी पुरवठा योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित कराव्यात, तसेच पांदन रस्त्यांच्या कामांना गती देणे गरजेचे आहे.

आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी जलसंधारणासाठी ब्रीज कम बंधारे उभारणे आणि शेतकरी, नागरिकांना प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे सांगितले. आमदार अभिमन्यू पवार यांनी पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरयुक्त वापर करण्यासाठी जनजागृती हवी असल्याचे सांगितले. बैठक दरम्यान, महावितरणला पाणी पुरवठा योजनांची वीज खंडित न करण्याचे निर्देश दिले गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT