Livestock in crisis due to drought; price of a pair of bullocks crosses a lakh!
विठ्ठल कटके
रेणापूर : दुष्काळाच्या झळा केवळ सर्वसामान्य माणसांनाच नव्हे, तर मुक्या जनावरांनाही सोसाव्या लागत आहेत. हिरवा चारा आणि पिण्याच्या पाण्याअभावी पशुपालकांची मोठी कोंडी झाली असून, पोटच्या मुलांप्रमाणे जपलेली जनावरे विक्रीसाठी बाजारात आणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दुष्काळामुळे पशुधनाच्या किमती निम्म्यावर आल्या असून, दोन लाख रुपये किमतीची बैलजोडी आता एक लाख रुपयांना विकली जात आहे. दुभत्या जनावरांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत.
विसाव्या पशुगणनेनुसार रेणापूर तालुक्यात एकूण ५६ हजार ३२७ जनावरे आहेत. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे या पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हिरवा चारा आणि कडबा मिळणे कठीण झाले असून, चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. पैसे देऊनही कडबा उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकरी ऊस कापून जनावरांना खाऊ घालत आहेत. सोयाबीनच्या गुळीचाही चारा म्हणून वापर केला जात आहे. पशुखाद्य महागल्याने दूध उत्पादनावर परिणाम झाला असून, दुधाच्या दरातही वाढ झाली आहे. शासनाकडून जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याच्या घोषणा करण्यात आल्या असल्या, तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही.
तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे. नदीनाले कोरडे पडले असून, विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत घट होत आहे. माणसांच्या पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न गंभीर असताना जनावरांसाठी पाणी आणायचे कोठून, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा आहे. बदलत्या शेतीपद्धतीचाही बैलांच्या मागणीवर परिणाम झाला आहे. पूर्वी कारखान्यांना बैलगाड्यांतून ऊस वाहतूक केली जात होती.
आता हार्वेस्टरच्या माध्यमातून ऊसतोड होत असल्याने बैलांची गरज कमी झाली आहे. त्यात दुष्काळाची भर पडल्याने पशुधनाच्या किमती कोसळल्या आहेत. रेणापूरच्या बाजारात पूर्वी जनावरांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत असे. आता खरेदीदारांची संख्या घटल्याने जनावरे विकण्यासाठी पशुपालकांना बाहेरगावी जावे लागत आहे.
दरम्यान, आर्थिक अडचणीत सापडलेला जातीवंत पशुपालक आपली जनावरे थेट कसायाला विकण्यास तयार होत नाही. याचाच फायदा घेत काही दलाल सक्रिय झाल्याची चर्चा आहे. हे दलाल स्वतःच्या घरी जनावरे पाळायची असल्याचे सांगून पशुपालकांकडून जनावरे खरेदी करतात आणि नंतर ती कसायांना विकत असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे पशुधनाच्या घटत्या संख्येबरोबरच अशा व्यवहारांबाबतही चिंता व्यक्त होत आहे.
कसायासाठी दलालाची टोळी सक्रिय
जातीवंत पशुपालक आर्थिक अडचणीत असला, तरी तो आपली जिवापाड जपलेली जनावरे थेट कसायाला विकण्यास तयार होत नाही. ही बाब लक्षात घेऊन काही कसायांनी दलालांमार्फत जनावरे खरेदी करण्याची पद्धत अवलंबल्याची चर्चा आहे. दलाल पशुपालकांकडे जाऊन स्वतःच्या घरी जनावरे पाळायची असल्याचे सांगतात. त्यांचा विश्वास संपादन करून जनावरे खरेदी केली जातात. मात्र या खरेदीसाठीचा पैसा कसायांचाच असतो आणि खरेदी केलेली जनावरे नंतर त्यांच्याकडेच पोहोचवली जात असल्याचे सांगितले जाते. रेणापूर परिसरात अशा दलालांचे टोळके सक्रिय असल्याची चर्चा आहे.