लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर मंगळवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. "आमच्याकडे डोळे वटारून का पाहतोस?" या क्षुल्लक कारणावरून सहा तरुणांनी एका युवकाला भर दिवसा मारहाण केली. मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हा प्रकार एका हॉटेलसमोर घडला. हल्लेखोर मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी बेल्ट, काठी आणि दगडांचा वापर करत युवकाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चौघांना अटक केली. नुसतीच अटक न करता, त्यांना घटनास्थळापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत चोप देत धिंड काढली. पोलिसांसमोर आरोपी गयावया करत होते. या घटनेमुळे लातूरकरांमध्ये अस्वस्थता असून गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.