bribery case (Pudhari Photo)
लातूर

Latur bribery case : 'खाकी'वर डाग की 'दलाली'चा बाजार? उदगीरमध्ये पोलिसांचाच लाचखोरीचा ‘रॅकेट’ उघड!

पोलिस निरीक्षकासह एक कर्मचारी 'लाचलुचपत' च्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

उदगीर : जनतेचे रक्षण करण्याची शपथ घेतलेल्या खाकी वर्दीवरच काळा डाग उमटवणारी संतापजनक घटना उदगीरमध्ये उघडकीस आली आहे. गुन्ह्यातून सुटका करून देण्यासाठी लाखोंची बोली लावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा ‘डील’ थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उद्ध्वस्त केला आहे. या धक्कादायक कारवाईत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकासह एक कर्मचारी रंगेहाथ जाळ्यात अडकले असून, संपूर्ण पोलिस यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

पुण्यातील तक्रारदाराने धाडस दाखवत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आणि पोलिसांच्या ‘दरबारातील’ काळा व्यवहार चव्हाट्यावर आणला. तक्रारदारांचे मेव्हुणे रणजित मल्हारी पाटील याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तब्बल ३ लाख रुपयांची उघड उघड मागणी करण्यात आली होती. म्हणजेच न्याय आणि कायदा विक्रीसाठी ठेवला होता का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

२ एप्रिलला सापळा रचण्यात आला आणि या काळ्या व्यवहाराचा ‘लाईव्ह शो’च उघड झाला. पोलिस कर्मचारी राहुल नागरगोजे याने स्वतःच्या हाताने ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला गाठले. मात्र, खरी धक्कादायक बाब म्हणजे, हा पैसा थेट पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या ‘इशाऱ्यावर’ घेतला जात असल्याचे स्पष्ट झाले.

लाच घेतल्यानंतर नागरगोजेने निरीक्षकांना फोन करून “काम झालं” असा संदेश दिला आणि निरीक्षकांनीही “पैसे पाठवा, मदत करतो” असे सांगत स्वतःचा सहभाग उघड केला. म्हणजेच, खाकीत बसूनच दलालीचा उघड बाजार मांडला गेला होता, हे स्पष्ट झाले आहे. या कारवाईत आरोपींकडून लाचेची रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आले असून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. घरझडतीची कारवाईही सुरू असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“जनतेचा रक्षकच जर भक्षक बनला, तर न्याय कुणाकडे मागायचा?” असा जळजळीत प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. उदगीरमधील ही घटना केवळ एक प्रकरण नसून, संपूर्ण यंत्रणेतील ‘काळ्या व्यवहाराचा’ मोठा इशारा असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT