Animal deaths due to lightning
उदगीर : उदगीर तालुक्यातील हंगरगा शिवारात पोल्ट्री फार्मचे वादळी वाऱ्यात पत्रे उडून गेल्याने ६०० कोंबड्या दगावल्या तसेच वीज पडून कल्लूर येथे एक म्हैस तर खेर्डा येथे दोन म्हशी आणि बामणी येथे एक गाय दगावल्याची घटना बुधवारी (१४ मे) सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
हंगरगा येथे वादळी वाऱ्यात गट नं.८८ मधील भागवत संभाजी केंद्रे व रंजना संभाजी केंद्रे यांच्या पोल्ट्री फॉर्म मधील ६०० कोंबड्या दगावल्या तर पशुखाद्याचा गोडाऊन मधील मक्याची शेकडो पोती पाण्यात भिजून मोठे नुकसान झाले आहे. तर बामणी येथील बालाजी वामन घोगरे यांची गाय वीज पडून ठार झाली आहे.
खेर्डा येथे संग्राम बापूराव राजवाड यांच्या दोन म्हशी ठार झाल्या असून कल्लूर येथील बाबाराव धोंडीबा शेंडगे यांची म्हैस शेतामध्ये वीज पडून ठार झाली आहे. याची माहिती तालुका प्रशासनाला देण्यात आली असून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.