Latur Udgir rainfall damage
उदगीर: तालुक्यातील धडकनाळ व बोरगाव गावात रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी शिरले आणि भीषण परिस्थिती निर्माण झाली. गाव चारही बाजूंनी पाण्याने वेढल्याने ग्रामस्थांचे संसार उद्ध्वस्त झाले.
पुराच्या पाण्यात शेळ्या, जनावरे, ट्रॅक्टर आणि एक पिकअप वाहन वाहून गेले असून हजारो एकर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. बोरगावने अक्षरशः तळ्याचे रूप धारण केले. रात्रभर गावकरी भीतीच्या वातावरणात अडकून पडले. उदगीर–मुख्रमाबाद–देगलूर रस्ता आणि धडकनाळ येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली.
अतिवृष्टीमुळे घरांचे, शेतीचे व पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. पहाटेपासून प्रशासनाची यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन मदत व पुनर्वसनाची कामे सुरू आहेत. उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी पंचनाम्याचे आदेश दिले असून महसूल व पशुसंवर्धन विभागाकडून तातडीने पाहणी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, लायन्स क्लब, रोटरी क्लब, व्यापारी गणेश मंडळ आदी स्वयंसेवी संस्थांनी पूरग्रस्तांसाठी अन्नाची व्यवस्था केली आहे. प्रशासनाने गावकऱ्यांना धीर देत शक्य तितक्या लवकर मदत पोहचविण्याचे आश्वासन दिले आहे.