Latur Udgir Illegal Money Lenders  Pudhari
लातूर

Udgir Illegal Money Lenders | उदगीरमध्ये सहा अवैध सावकारांवर सहकार विभागाची धडक कारवाई

कोरे धनादेश, स्टॅम्प पेपर, प्रॉमिसरी नोट, कर्जखते अन् सातबारा उतारे जप्त

पुढारी वृत्तसेवा

Latur Udgir Illegal Money Lenders

उदगीर : तालुक्यातील अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सहकार विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत उदगीर शहर व तालुक्यातील सहा संशयित अवैध सावकारांच्या ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करून झडती घेण्यात आली. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील कलम १६ अन्वये मिळालेल्या अधिकारांतर्गत ही कारवाई करण्यात आली.

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, उदगीर यांच्या पथकाने संत तुकाराम नगर येथील शामू रामदास काबरे, नवा मोंढा येथील गणू ऊर्फ गणेश पांडे व राजीव बेलदार, नगर परिषद कॉम्प्लेक्समधील दुकान क्रमांक ८८ येथील शिवाजी नामदेवराव पवार, मेन रोड येथील अमोल अशोकराव कोल्हेवार आणि हाळी येथील विक्रम माने यांच्या ठिकाणी झडती घेतली.

या कारवाईदरम्यान कथित अवैध सावकारीसाठी वापरले जाणारे कोरे स्टॅम्प पेपर, कोरे धनादेश, प्रॉमिसरी नोट, कर्जखते, सातबारा उतारे, खरेदीखते तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली. जप्त केलेले सर्व दस्तऐवज सहाय्यक निबंधक कार्यालय, उदगीर येथे जमा करण्यात आले असून, त्यांची तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

एकाच वेळी सहा ठिकाणी कारवाई करण्यात आल्याने संबंधितांना पुरावे नष्ट करण्याची किंवा तेथून पसार होण्याची संधी मिळाली नाही. या कारवाईमुळे अवाजवी व्याजदराने कर्ज देऊन सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या कथित अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत.

१२ कर्मचाऱ्यांचे पथक; पोलिसांचा बंदोबस्त

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, उदगीरचे डी. बी. कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. तालुका सहकार अधिकारी, सहकार अधिकारी पवार, जाधव, निले, आर. एस. गायकवाड, सहाय्यक सहकार अधिकारी तसेच सहकार विभागातील अन्य १२ कर्मचाऱ्यांचा पथकात समावेश होता.

या पथकाला उदगीर शहर व ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आणि १४ पोलिस अंमलदारांनी संरक्षण दिले.

ही कारवाई जिल्हाधिकारी भारत कटोले, जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा उपनिबंधक नामदेवराव पठाण, विभागीय सहनिबंधक कोरे-पाटील, सहाय्यक निबंधक राम बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अवैध सावकारीबाबत नागरिकांकडे तक्रार किंवा माहिती असल्यास त्यांनी सहकार विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, उदगीर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT