Latur newborn surgery pudhari photo
लातूर

Latur newborn surgery : श्वासासाठी झुंज; तीन दिवसांच्या बाळावर दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया

लातूरच्या व्हीडीजीएमसीची कामगिरी, मराठवाड्यात शासकीय रुग्णालयात प्रथमच शस्त्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

लातूर, : जन्माला येऊन अवघे तीन दिवस झालेले बाळ जन्मजात श्वासपटलाच्या दोषामुळे श्वास घेण्यासाठी झुंजत होते. अशा गंभीर परिस्थितीत लातूरच्या श्री विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांनी अवघ्या तीन मिलिमीटरच्या छिद्रातून दुर्बिणीद्वारे गुंतागुंतीचीशस्त्रक्रिया यशस्वी केली. मराठवाड्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवजात बाळावर अशा प्रकारची शस्त्रक्रिया प्रथमच झाल्याचे सांगण्यात आले.

महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेडीयाट्रीक लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. संजय पौळ-पाटील यांनी ही शस्त्रक्रिया केली. बाळामध्ये जन्मजात श्वासपटलाचा दोष असल्याचे गर्भावस्थेतच निदान झाले होते.

या विकारात श्वासपटलामध्ये दोष निर्माण झाल्याने पोटातील आतडी व इतर अवयव छातीच्या पोकळीत जातात. त्यामुळे फुफ्फुसांच्या वाढीवर परिणाम होऊन जन्मानंतर बाळाला श्वास घेण्यास गंभीर अडचण निर्माण होऊ शकते.

बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला श्वसनाचा त्राससुरू झाला. त्यामुळे कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवून प्रकृती स्थिर करण्याचे प्रयत्न करण्यात आले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर शस्त्रक्रियेचानिर्णय घेण्यात आला.

या शस्त्रक्रियेसाठी डॉ. मेघराज चावडा, डॉ. गणेश स्वामी आणि भूलतज्ज्ञ डॉ. शिरसाट यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. शस्त्रक्रियेनंतर अतिदक्षता विभागात बालरोगतज्ज्ञ डॉ. अजय कुसुंबीवाल, डॉ. किरण होळीकर आणि डॉ. विकास साळुंखे यांनी बाळाची देखरेख व उपचार केले.

दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचे फायदे

पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत दुर्बिणीद्वारे अत्यंत लहान छिद्रांतून शस्त्रक्रिया करता येते. त्यामुळे मोठी जखम, रक्तस्त्राव आणि संसर्गाचा धोका कमी होतो. शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती लवकर सुधारण्यास मदत होते. औषधोपचाराचा कालावधी कमी होऊन बाळाला लवकर दूध सुरू करता येण्याची शक्यता असते. तसेच मोठ्या चिऱ्याचा व्रण राहत नसल्याने भविष्यातील सौंदर्यात्मक परिणामही चांगले राहतात, असे डॉ. संजय पौळ-पाटील यांनी सांगितले.

मराठवाड्यासाठी महत्त्वा‍चे - ही अतिशय गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया होती. मात्र बालशल्यचिकित्सक डॉ. संजय पौळ-पाटील आणि सहभागी वैद्यकीय पथकाने ती अत्यंत कौशल्याने यशस्वी केली आणि चिमुकल्याला जीवदान दिले. लातूरमध्ये उपलब्ध असलेल्या सुपरस्पेशालिटी सुविधांमुळे हे शक्य झाले. लातूरच्या शासकीय रुग्णालयात ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने मराठवाड्यातील बालरुग्णांना उच्च दर्जाच्या शस्त्रक्रिया सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
डॉ. उदय मोहिते-पाटील, अधिष्ठाता, व्हीडीजीएमसी, लातूर
यश मिळाले - नवजात बाळाचे अत्यंत लहान आकारमान आणि छाती-पोटातील महत्त्वाच्या अवयवांची जवळीक यामुळे ही शस्त्रक्रिया मोठे आव्हान होते. शस्त्रक्रियेदरम्यान छातीमध्ये हृदय व फुफ्फुसांसारखे महत्त्वाचे अवयव, तर पोटाच्या भागात आतडी व किडनी यांसारखे अवयव असतानाही कोणत्याही अवयवाला इजा न पोहोचविता दोषपूर्ण श्वासपटलाची दुरुस्ती करण्यात आली.अवघ्या तीन मिलिमीटरच्या छिद्रांमधून दुर्बिणीद्वारे ही नाजूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
डॉ. संजय पौळ पाटील, पेडीयाट्रीक लॅप्रोस्कोपिक सर्जन व्हीडीजीएमसी, लातूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT