Latur news Pudhari Photo
लातूर

Latur news: क्षुल्लक कारणावरून एस.टी. महिला कर्मचाऱ्यावर प्रवाशाने उगारला हात; आगारात संतापाची लाट

Latur ST woman conductor assault latest news: या घटनेमुळे राज्यभरातील एस.टी. महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

निलंगा : बसमधील प्रवाशांना केवळ "मागे सरका" असे सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका संतप्त प्रवाशाने एसटी महिला वाहकाला बेदम मारहाण करून बसमधून खाली ढकलण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना झरी येथे घडली. या प्रकारामुळे निलंगा आगारातील एस.टी. कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकं काय घडलं?

निलंगा आगाराची उदगीर-निलंगा बस (क्र. एमएच १४ बीटी १४२०) बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास झरी गावातील थांब्यावर आली. बसमध्ये गर्दी असल्याने महिला वाहक सविता तानाजी घंटे (बॅच क्र. १३११०) यांनी प्रवाशांना मागे सरकून उभे राहण्याची विनंती केली. याचा राग मनात धरून प्रवासी सुधाकर व्यंकट पाटील याने वाहक सविता घंटे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, पाटील याने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. इतकेच नव्हे, तर त्याने क्रूरतेचा कळस गाठत त्यांना चालत्या बसमधून खाली ढकलण्याचाही प्रयत्न केला. या घटनेमुळे बसमधील इतर प्रवासी आणि चालकही हादरले.

घटनेनंतर कर्मचारी आक्रमक

या घटनेची माहिती कळताच निलंगा आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी तात्काळ निलंगा पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांची भेट घेतली. आरोपी सुधाकर पाटील याला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली. महिला वाहक सविता घंटे यांच्या तक्रारीवरून निलंगा पोलिसांनी आरोपी सुधाकर पाटील विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या घटनेमुळे एस.टी. महामंडळात काम करणाऱ्या, विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दररोज हजारो प्रवाशांशी थेट संपर्क येणाऱ्या वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांना अशा प्रसंगांना सामोरे जावे लागत असेल, तर त्यांच्या मनोबलावर परिणाम होऊ शकतो. या घटनेच्या निमित्ताने कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT