अहमदपूर :तालुक्यातील तांबट सांगवीजवळ एम.एच. २० बीएल - २३३१ क्रंमाकची बस रविवारी सकाळी अकराच्या सुमारास नागठाण्याकडून अहमदपूरकडे येणारी प्रवासी बस अचानक रस्त्याच्या बाजूला पलटी झाल्याने २१ प्रवासी जखमी झाले. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस नागठाणा परिसरातील प्रवाशांना घेऊन अहमदपूरकडे येत होती. तांबट सांगवीजवळील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. या अपघातात रमेश वामनराव नवटक्के, कौसाबाई नागनाथ शेरे, जयश्री रमेश नवटक्के, अमिनाबी कचरू पठाण, लक्ष्मीबाई बाबुराव घोगरे, रशिदाबी इमाम पठाण, मुमताज मुसा पठाण, निजाम मौलासाब शेख, मनोहर धोंडीबा शिंदे, इमाम गफूर पठाण, ज्ञानोबा व्यंका धानेवाड, गिरजाबाई किशनराव कानवटे, सरुबाई सोपान मेकरवाड, मुद्रिका गोविंदराव भदाडे, पिराजी गोविंद भदाडे, दौलतराव बाबुराव घोगरे, सिकंदर नूर शेख, लक्ष्मण आप्पाराव इंगळे, नारायण अशोक केंद्रे, रविराज सोमनाथ शेरे आणि काजल सोमनाथ शेरे हे जखमी झाले.
अपघात होताच बसमधील प्रवाशांनी मोठ्याने आरडाओरड सुरू केली. आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. ग्रामस्थांनी बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालय प्रशासन सतर्क झाले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी शहरातील खासगी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना तत्काळ संपर्क साधून मदतीचे आवाहन केले. त्यानंतर अनेक खासगी डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आणि जखमी प्रवाशांवर उपचार सुरू करण्यात आले.
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, डॉ. जयप्रकाश केंद्रे, डॉ. सूरजमल सिंहाते, डॉ. अमृत चिवडे, डॉ. राजकुमार टकटवळे, डॉ. नरहरी सुरनर, डॉ. प्रवीण भोसले, डॉ. बाळासाहेब मुंडे आणि डॉ. रोहित निजवंते यांनी उपचाराची धुरा सांभाळली. तसेच शहरातील खासगी डॉक्टर डॉ. प्रमोद वट्टमवार, डॉ. चंद्रकांत उगीले, डॉ. वैभव रेड्डी, डॉ. सतीश पेड, डॉ. गिरीश देवकते, डॉ. बालाजी मुसळे आणि डॉ. गोविंद खोडवे यांनीही रुग्णालयात येऊन जखमी प्रवाशांवर उपचार केले. वेळीच उपचार मिळाल्याने सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.