Udgir Nilanga highway closed
सतीश बिरादार
देवणी : गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने मांजरा नदी पात्रात पाण्याचा येवा वाढला आहे. मांजरा नदीवरील धनेगाव येथील पुलावरून रात्री पासून पाणी जात असल्याने उदगीर - निलंगा राज्यमार्ग बंद झाला आहे. शुक्रवारी दिवसभर वाहतूक बंद राहील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर सुरु आहे. यामुळे तालुक्यासह भिमा भागातील दळणवळण यंत्रणा बंद झाली आहे. नदीकाठच्या शिवारात व बॅक वॉटर शेतात शिरले असल्याने खरीपाची पिके पाण्याखाली गेली आहेत. पुराने प्रचंड नासाडी झाली आहे. कोठेही वित्त हानी , जीवीत हानी होवु नये म्हणुन प्रशासन लक्ष ठेवून आहे. तालुक्यातील देवणी मंडळात ६९ मिमी, बोरोळ मंडळात ६४ मिमी तर वलांडी मंडळांत ७० मिमी पावसाची नोंद शासनाच्या दप्तरी नोंदवली गेली.
मांजरा नदीवर असलेल्या धनेगाव उच्चस्तरीय बॅरेज बंधाऱ्यांची सहा दरवाजे पुर्ण उघडले असुन ३००० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला असल्याची माहिती शाखा अभियंता दत्ता कोल्हे यांनी दिली.तर डोंगरगाव बॅरेज बंधाऱ्यांचे ६ दरवाजे उघडले असुन १६०० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग तर होसुर बंधाऱ्यांची ८ दरवाजे पुर्णतः उचलुन २५०० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला असल्याची माहिती शाखा अभियंता अजय जोजारे यांनी दिली.
तहसिलदार सोमनाथ वाडकर,पोनि भिमराव गायकवाड यांनी धनेगाव येथील नदीपात्रातील पाण्याची माहिती घेवुन नागरिकांना सतर्कता बाळगावी असे आवाहन केले.पुलावरुन पाणी जात असताना कोणीही ते जा करु नये ,जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावी , लहान बालकांची काळजी घ्यावी.नुकसान झाले असल्यास महसुल व आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
पावसाने कहर केला असुन आलेल्या पुराने अनेकांची पिके पाण्याखाली गेली. यामुळे शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. शासनाने यांची दखल घेऊन सरसकट पंचनामे करावे, अशी मागणी भाजयुमो चे तालुकाध्यक्ष रामलिंग शेरे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केली आहे.