जळकोट ( लातूर ) : अजिज मोमीन
जिल्हा परिषद / पंचायत समितीच्या सदस्य पदासाठीचे जळकोट तालुक्याचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून येत्या नोव्हेंबर - डिसेंबर मध्ये प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. आरक्षण जाहीर होताच निवडणुक लढविण्याकरिता इच्छुक असलेले उमेदवार पूर्वतयारीला लागले आहेत. आरक्षणामुळे काही जणांना इतर मतदार संघात जाऊन निवडणूक लढवावी लागणार आहे. तथापि, जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाबाहेरील उमेदवारांना मतदार स्वीकारतील का? हा मुद्दा सध्या तालुक्यातील जाणकारांतून चर्चिला जात आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून जाण्यासाठी जळकोट तालुक्यातील अनेक दिग्गज, उत्सुक आहेत. अनेक जणांनी ब-याच दिवसापासून तयारीही सुरु केलेली आहे. मात्र मनासारखे आरक्षण निघाले नसल्याने काही जणांचा हिरमोड झाला आहे तर या आरक्षणानंतर आपणच सदस्य होणार असा दृढ विश्वास काही जणांना वाटत आहे. काही इच्छुक उमेदवार स्वतः साठी पोषक वाटणा-या शेजारच्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत.
जाहीर झालेल्या आरक्षणाच्या स्थितीनुसार स्वमतदार संघात संधी नसल्याने अनेक दिग्गज उमेदवार आता बाहेरच्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत. स्वतः चा मतदार संघ आणि बाहेरचा मतदार संघ यामध्ये निश्चितच थोडा फरक राहणार आहे. कारण स्थानिक उमेदवाराला मतदारांकडून अधिकचा कौल मिळू शकतो. तर बाहेरच्या उमेदवाराला खूप कष्ट करावे लागतील. एखाद्या मतदार संघात तगडा उमेदवार मिळत नसेल तर बाहेरचा उमेदवार देण्याची वेळ राजकीय पक्षांवर येणार आहे हे ही खरे आहे. काही मोजक्याच जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातून निवडणूक लढविण्याची तयारी करीत असलेल्या उमेदवारांची नावे समोर आली असली तरी जळकोट तालुक्यातील ब-याच गट व गणांत अजूनही शांतताच आहे. त्यामुळे यश खेचून आणण-ारा उमेदवार देण्यासाठी राजकीय पक्षांना दमछाक करावी लागणार आहे. आपल्या नेतेमंडळींच्या आशीर्वादाने आपण निवडून येऊ शकतो असा विश्वासही काही जणांमध्ये भरुन राहिलेला आहे. जळकोट तालुक्यातील ब-याच जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये त्या मतदारसंघाच्या बाहेरील उमेदवार निवडणूक लढवतील असे चित्र आहे. पण स्थानिक उमेदवारास टाळून बाहेरच्या उमेदवारांना मतदार स्वीकारणार का? हा मुद्दा महत्त्वाचा ठरणारा आहे.