औराद शहाजानी (ता. निलंगा, लातूर) : येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कथित त्रासाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बबलू खलील बेलुरे असे या मृत तरुणाचे नाव असून, आत्महत्येपूर्वी त्याने बनवलेला एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने थेट सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचे नाव घेतल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बबलू बेलुरे याने तेरणा नदीच्या काठावर असलेल्या एका झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी बबलूने मोबाईलवर स्वतःचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये त्याने औराद शहाजानी पोलीस ठाण्याचे सपोनि विठ्ठल दुरपडे आणि त्यांचे अवैध धंद्याचे आर्थिक व्यवहार पाहणारे पोलीस कॉन्स्टेबल तानाजी टेळे हे आपल्याला नाहक त्रास देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
बबलूचा मृतदेह सापडल्यानंतर आणि त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच औराद शहाजानीमध्ये संतापाची लाट उसळली. मृत युवकाचे नातेवाईक आणि संतप्त ग्रामस्थांनी थेट पोलीस ठाणे गाठून ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत माघार न घेण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
गावात तणाव, मोठा बंदोबस्त
घटनेचे गांभीर्य ओळखून आणि बिघडलेली कायदा व सुव्यवस्था पाहता, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस प्रशासनाकडून व्हिडिओची सत्यता तपासून पुढील कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
तरुणाने काय म्हटलंय व्हिडीओत?
आत्महत्या करायच्या आधी तयार केलेल्या व्हिडीओमध्ये त्या युवकाने पोलीस अधिकारी त्रास देत असल्याचं सांगितलं. तो म्हणाला की, मला त्या पीएसआयने त्रास दिला. आता सहन होत नाही. माझ्याकडून चोरीचा गु्न्हा झाला, पण माझी ती चूक झाली. मी तसं करायला नको होतं. त्यानंतर मला आणि माझ्या परिवाराला रात्री-अपरात्री त्रास देण्याचं काम सुरू केलं. आता मला सहन होत नाही. त्यामुळे मी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या करतो. याला सर्वस्वी जबाबदार तो पीएसआय आणि त्याचा ड्रायव्हर आहे.