Gram Rojgar Sahayak Strike Pudhari
लातूर

Latur News | थकीत मानधनासाठी ग्राम रोजगार सहाय्यकांचे आजपासून काम बंद आंदोलन

२४ महिन्यांचे मानधन थकीत; सेवा संरक्षणासह विविध मागण्यांसाठी संघटना आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

Gram Rojgar Sahayak Strike

निलंगा : प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्याने निलंगा तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघ महासंघाच्या वतीने तहसीलदार तथा गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, गुरुवारपासून (ता. ८) तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांनी अनिश्चितकाळ काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्राम रोजगार सहाय्यकांचे मागील २४ महिन्यांचे थकीत मानधन तातडीने अदा करावे, कायमस्वरूपी सेवा संरक्षण द्यावे, तसेच ग्रामसभेच्या निर्णयावरून सेवा समाप्त करण्याची पद्धत बंद करावी, अशा प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत. शासन निर्णयानुसार प्रलंबित मानधन मिळावे, दरमहा आठ हजार रुपये मानधन आणि दोन हजार रुपये प्रवास भत्ता नियमित द्यावा, तसेच मानधनाची रक्कम थेट बँक खात्यात वेळेत जमा करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

ग्राम रोजगार सहाय्यकांना सेवा-सुरक्षा आणि सुरक्षा कवच देण्याची मागणीही संघटनेने केली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही मागण्यांबाबत ठोस निर्णय झालेला नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या आंदोलनामुळे निलंगा तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील मनरेगाअंतर्गत कामकाज आणि संबंधित प्रशासकीय प्रक्रियांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे ग्राम रोजगार सहाय्यकांचे लक्ष लागले आहे.

यावेळी अभय दादा सोळुंके,अजित माने,संघटनेचे अध्यक्ष कमलाकर वाघे, खंडू गायकवाड, तालुका सचिव बालाजी मोरे, कोषाध्यक्ष , संघटक श्रीधर लोभे, प्रसिद्धी प्रमुख काशीनाथ कळशे व सिद्धनाथ माने संदीप बगदुरे तसेच यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT