औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील एका युवकाने औराद सपोनि विठ्ठल दुरपडे व त्यांचे अवैध धंद्याचे आर्थिक व्यवहार बघणारे पोलीस कॉन्स्टेबल तानाजी टेळे यांच्या कथित त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित युवकाने व्हिडिओ तयार करून पोलिसांच्या त्रासामुळेच आत्महत्या करत असल्याचा आरोप केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत युवकाचे नाव बबलू खलील बेलुरे (रा. औराद शहाजानी) असे असून, त्याने तेरणा नदीच्या काठावर, बाजूला असलेल्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये बबलू बेलुरे याने पोलिसांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगितले आहे. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली.
या घटनेनंतर मृत युवकाच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत असून, त्यामुळे परिसरातील वातावरण चिघळले आहे. तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने औराद शहाजानी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओची सत्यता तपासून दोषींवर पोलीस अधिकारी विठ्ठल दुरपडे व त्यांचे अवैध धंद्याचे आर्थिक व्यवहार बघणारे पोलीस कॉन्स्टेबल तानाजी टेळे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी नातेवाईक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पोलिस प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू असून, पुढील कारवाई चौकशीअंती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.