Latur News : बनावट दिव्यांग प्रमाणपत्रप्रकरणी दोघांना तीन वर्षांचा कारावास pudhari photo
लातूर

Latur News : बनावट दिव्यांग प्रमाणपत्रप्रकरणी दोघांना तीन वर्षांचा कारावास

शासनाची फसवणूक करून नोकरी मिळविण्याचा प्रयत्न; प्रत्येकी १० हजारांचा दंड

पुढारी वृत्तसेवा

Latur News : Three years imprisonment for two in case of fake disability certificate

लातूर, पुढारी वृत्तसेवा : बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक करत ग्रामसेवक पदाची नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा आरोपींना न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची तसेच प्रत्येकी १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

या प्रकरणी तत्कालीन गटविकास अधिकारी बळीराम टोपाजी चव्हाण यांच्या फिर्यादीवरून २३ फेब्रुवारी २००८ रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासात निलंगा येथील श्रीराम ज्ञानेश्वर पाटील आणि माळेगाव (ता. निलंगा) येथील ज्ञानेश्वर वसंतराव दोडतल्ले यांनी भरती प्रक्रियेदरम्यान बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचे निष्पन्न झाले. तत्कालीन पोलिस निरीक्षक डी. एस. बिराजदार यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यात सरकारी अभियोक्ता रामेश्वर ढेले यांनी युक्तिवाद केला.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून संबंधित प्रमाणपत्र कधीही जारी झाले नसल्याचे पुराव्यांद्वारे सिद्ध झाल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी एम-एन. चव्हाण यांनी ४ जुलै रोजी दोन्ही आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम ४१७ व ४६८ अंतर्गत दोषी ठरवत तीन वर्षांच्या कारावासाची व प्रत्येकी १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

या खटल्याच्या यशस्वी पाठपुराव्यासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रायल मॉनिटरिंग सेलचे सहायक पोलिस निरीक्षक शिवशंकर मनाळे आणि पैरवी अंमलदार सचिन उस्तुरगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT