शिरूर अनंतपाळ: तालुक्यात रविवारी (दि.28) घेण्यात आलेल्या NMMS (National Means-cum-Merit Scholarship Scheme) स्पर्धा परीक्षेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या परीक्षेची जबाबदारी खाजगीरित्या NMMS चे शिकवणी वर्ग चालविणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकाच्या हाती दिल्याचा प्रकार समोर आला असून, संबंधित शिक्षकाने आपल्या खाजगी क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कॉपी पुरविल्याचा गंभीर आरोप पालक व विद्यार्थी वर्गातून करण्यात येत आहे.
सदर NMMS परीक्षा रविवारी (दि. २८ डिसेंबर) श्री अनंतपाळ नूतन विद्यालय, शिरूर अनंतपाळ येथे पार पडली. या परीक्षेचा संपूर्ण कारभार शिक्षण विभागाकडून भोजराज नगर जिल्हा परिषद शाळा, शिरूर अनंतपाळ येथील एका शिक्षकाकडे सोपविण्यात आला होता. मात्र, हेच शिक्षक NMMS चे खाजगी क्लासेस चालवत असल्याने हितसंबंधाचा (Conflict of Interest) मुद्दा ऐरणीवर आला आहे.
पालक व विद्यार्थ्यांच्या आरोपानुसार, संबंधित शिक्षकाने आपल्या खाजगी शिकवणीला येणाऱ्या विद्यार्थ्यांना २० गुणांचे MAT आणि २० गुणांचे SAT प्रश्नपत्रिकेतील उत्तरे (कॉपी) पुरविली. त्यामुळे इतर गरीब व होतकरू, परंतु प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
NMMS ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाची शिष्यवृत्ती योजना असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण हुशार विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत दरवर्षी १२,००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडू नये, हा आहे. मात्र अशा प्रकारांमुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच संबंधित परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी जोरदार मागणी पालक, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. शिक्षण विभाग या गंभीर आरोपांची दखल घेऊन काय भूमिका घेतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. याबाबत गटशिक्षणाधिकारी अनिल पागे यांच्याशी संपर्क केला असता काॅपीचा पुरविल्याचा असा प्रकार काही घडला नाही मी तीथे बसुन होतो त्या शिक्षकाची नेमणूक शिक्षणाधिकारी यांनी केली होती तो खाजगी शिकवणी घेतो किंवा नाही याची माहिती मला नाही असे ते म्हणाले.