चाकूर : तालुक्यातील आष्टा मोड येथे राष्ट्रीय महामार्गावरील नियोजनातील त्रुटींमुळे तळपत्या उन्हात सामान्य नागरिक, प्रवाशांची होरपळ होत आहे. त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्यामुळे आष्टा मोड येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी जोर धरू लागली आहे. आष्टा मोड येथे उदगीर आणि नांदेड जाण्यासाठी शेकडो बस वाहतूक करतात परंतु बसस्थानक अभावी उड्डाणपुलापासून झिरो पॉईंटवर प्रवाशांना वाहनांची वाट पाहावी लागत आहे.
उदगीरहुन लातूरकडे जाण्यासाठी सर्व्हिस रोड बंद आहे. ती वाहने आष्टा मोड येथून चाकूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर झिरो पॉईंटवरून लातूरकडे जातात. तर लातूरहून चाकूर, अहमदपूर, नांदेडकडे जाणाऱ्या नागरिकांना आष्टा मोड येथील सर्व्हिस रस्ता बंद करण्यात आला आहे.
यंदा उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता लक्षात घेता उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, महिला व नागरिकांना भर उन्हात आष्टा मोडच्या राष्ट्रीय महामार्गावर ताटकळत थांबावे लागत आहे. लातूरहून नांदेडकडे जाणारी वाहने उड्डाणपुलावरून अतिशय वेगाने येतात. ते येथे थांबत नसल्याने प्रवाशांना राष्ट्रीय महामार्गावर उन्हाचे चटके खातच उभे राहावे लागत असल्याने महिला प्रवाशांची गैरसोय अधिकच वाढली आहे.
आष्टा मोड येथे प्रवासी निवारा किंवा बसस्थानक होणे गरजेचे आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निवारा आणि झाडांची सावली नसल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यातही हीच समस्या अधिक तीव्र होते. यामुळे प्रवाशांना उभे राहण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध नाही. दरम्यान, या भागातील सर्व्हिस रोडचे काम अनेक दिवसांपासून रखडलेले आहे.
संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. आता काम सुरू झाले आहे. ते काम कधी पूर्ण होणार याबाबत अनिश्चितता कायम आहे. परिणामी, नागरिकांची होणारी हेळसांड दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळ प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. झिरो पॉईंटवर सुरक्षित थांबा, बसस्टॉपसाठी निवारा (शेड) उभारणे आणि सर्व्हिस रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे या मागणीने जोर धरला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने तोडगा काढल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
"आम्ही गाडीची वाट पाहत एक तास झाले भर उन्हात थांबून आहोत. येथे एकही एसटी बस किंवा खाजगी वाहने थांबत नाहीत. याठिकाणी उन्हापासून बचावासाठी कसलीच व्यवस्था नाही, सावली नाही, पाणी नसल्यामुळे घशाला कोरड पडली आहे. आष्टा मोडपासून हा झिरो पॉईंट लांब आहे. त्यामुळे महिला, नागरिकांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय लवकरात लवकर थांबवावी."- ज्ञानेश्वर पाटील रा. शेवाळ (प्रवासी)