जळकोट: केंद्रिय रिझर्व्ह पोलिस फोर्स, लातूर येथे कार्यरत असलेले काॅन्सटेबल प्रशांत अमृत सेप यांचा अपघात होऊन ते शहीद झाले. बोरगाव खूर्द (ता. जळकोट ) या त्यांच्या मूळ गावी आज ता. 8 रोजी त्यांचेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. काल ता. 7 रोजी मांजरा साखर परिसर, लातूर येथे झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या बोरगाव खूर्द या गावावर शोककळा पसरली आहे.
देश रक्षणाची शपथ घेतली, प्राणांपेक्षा कर्तव्य मोठे ठेवले, सेवा करीत असतानाच वीर हृदय शांत झोपी गेलं अशी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण करण्यात आली.प्रशांत अमृत सेप या वीराला आमचे शतशः प्रणाम व कृतज्ञतापूर्वक स्मरण अशा सद्गदित भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.
गरुडझेप मित्र मंडळ, बोरगाव खूर्द यांच्या वतीने या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करण्यात आला आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंचक्रोशीतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी क्षेत्रातील अनेक मान्यवर अंत्यविधीला मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या शोकसंदेशाचे वाचनही यावेळी करण्यात आले.
सी आर पी एफ जवान तसेच अधिकारी यांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून या शहीद जवानास मानवंदना दिली. सरपंच रागिनी केंद्रे व सामाजिक कार्यकर्ते संजय केंद्रे यांनी ही आमच्या गावाला शोकसागरात बुडवणारी घटना आहे अशी भावना व्यक्त केली.