शिरूर अनंतपाळ तालुक्यातील लक्कडजवळगा जिल्हा परिषद शाळेतील झाडतोड प्रकरणाने शिक्षण विभागातील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सुटीच्या दिवशी अज्ञात व्यक्तींनी झाडे तोडल्याची लेखी माहिती पोलिस, शिक्षण विभाग व माध्यमांना देण्यात आली होती. मात्र ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर तब्बल चार महिन्यांनी हीच झाडे ठराव घेऊन तोडण्यात आली, अशी माहिती देत प्रभारी गटशिक्षणाधिकारी अनिल पागे यांनी स्पष्टपणे दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे.
विशेष म्हणजे, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून दिले गेले होते. पोलिस चौकशीचे निर्देशही देण्यात आले. असे असताना अचानक भूमिका बदलणे म्हणजे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न असल्याचा संताप ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. “धन जळल्याचा वास येत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.
बदल नियमांना धाब्यावर बसवून तब्बल दहा वर्षे एकाच तालुक्यात प्रभारी पदावर राहून शिक्षणाच्या पैशांवर फुसक्या मारणाऱ्यांवर आता तरी कारवाई होणार का, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. सीईओ आदेश डावलणे, गंभीर तक्रारी दडपणे, मनमानी बदल्या, खासगी शाळा तपासणीतील कथित आर्थिक व्यवहार—असे अनेक आरोप पुन्हा चर्चेत आले आहेत. प्रकरण दडपण्यात यश मिळाले असले तरी सत्य फार काळ लपून राहत नाही. आता तरी जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणार का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.