लातूर

Latur news | उन्हाच्या तीव्रतेचा नागरिकांसह पशुधनालाही फटका

किनगाव : झळांमुळे नागरिकांचे हाल ; दूध उत्पादनातही होतेय घट

पुढारी वृत्तसेवा

गोरख भुसाळे

किनगाव : सध्या उन्हाचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढले असून या वाढलेल्या उन्हाचा चटका नागरिकांना बसत आहे. त्यातच लाईटचा लपंडाव सुरू झाला आहे. नागरिकांना उन्हाचा चटका बसत असतानाच पशुधनाला सुद्धा उन्हाच्या झळा बसत आहेत. शेतीला जोड धंदा म्हणून अनेक शेतकरी दुधाचा व्यवसाय करतात मात्र उन्हाच्या तीव्रतेमुळे दुधात घट होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडत आहे.

या भागात शेतीला जोड धंदा म्हणून म्हैस व गाय पाळून अनेक शेकरी दुधाचा व्यवसाय करतात. या व्यवसायाला उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. उन्हाचा पारा वाढत असल्याने दूध उत्पादनात मोठी घट होत आहे. पशुधनाचा खुराक व खर्च निघणे अवघड होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या भागात चाऱ्याचा प्रश्न सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. या भागात शेतकरी हे आपले कुटुंब चालवण्यासाठी शेतीला जोड धंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करतात.

कारण शेतीवर कुटुंब चालवणे अवघड होते कारण शेतीचा पैसा हा वर्षाला माल विकल्यास मिळतो तो पण पाऊस काळ जसा पाहिजे तसा झाला तर अन्यथा शेतकरी कर्जबाजारी व आर्थिक कोंडीत सापडतो अशा वेळी कुटुंब कसे चालवायचे व मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे काही शेतकरी शेतीला जोड म्हणून दुधाचा व्यवसाय करतात. मात्र उन्हाच्या तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पशुधन व शेतकरी हैराण झाले आहेत. कारण चारा व खुराक ला जास्त पैसे जात आहेत आणि दूध कमी निघत आहे ज्यामुळे उत्पन्न कमी व खर्च जास्त लागत आहे.

शेतकऱ्यांनी हे करावे

जनावरांना शक्यतो सकाळी व संध्याकाळी ऊन कमी असताना चरण्यास सोडावे. हवामानपूरक सुधारित गोठे बांधावेत. गोठ्याची उंची जास्त असावी जेणेकरून हवा खेळती राहील. परिसर थंड राहण्यासाठी गोठ्याच्या भोवताली झाडे असावीत. जनावरांना मुबलक प्रमाणात थंड पाणी पिण्यासाठी उपलब्ध करावे. बैलांकडून मशागतीची कामे शक्यतो सकाळी व संध्याकाळी ऊन कमी असताना करावीत. उन्हाच्या तापामुळे जनावरांची भूक मंदावते. त्यामुळे शक्यतो थंड वातावरणात चारा टाकावा. म्हशीच्या कातडीचा काळा रंग व घामग्रंथीच्या कमी संख्येमुळे उष्णतेचा त्रास त्यांना गायींपेक्षा अधिक होतो. त्यामुळे त्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT