चाकूर : तालुक्यातील अलगरवाडी येथील शेतकरी शंकर गोपाळ चिटबोने यांनी २९ एप्रिल मंगळवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास स्वतःच्या शेतात विष प्राशन करून जीवन संपवल्याची घटना घडली आहे.
तीर्थवाडी सज्जाचे तलाठी यांनी तहसीलदार यांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की,अलगरवाडी येथील शेतकरी शंकर गोपाळ चिटबोने यांनी आपल्या स्वतःच्या शेतात विष प्राशन करून मंगळवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास आत्महत्या केली आहे. त्यांच्या नावावर एकूण २. ४९ जमिनीचे क्षेत्र असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान तहसीलदार यांनी चाकूर पोलीस निरीक्षक यांना आत्महत्याग्रस्त शेतकरी शंकर गोपाळ चिटबोने यांचा मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळाचा पंचनामा, जबाब आणि विष प्राशन केलेल्या वस्तूस्थितीबाबतचा जबाब, अभिप्राय कार्यालयास चार दिवसाच्या आत सादर करण्याचे पत्राद्वारे कळविले आहे.
त्याबरोबरच तालुका कृषी अधिकारी, सहाय्यक निबंधक आणि मंडळ अधिकारी यांच्या स्तरावरील मृत्यूबाबत कारण याचा अहवाल विना विलंब पाठविण्याचे लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
शंकर गोपाळ चिटबोने यांच्यावर मंगळवारी दुपारी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून सायंकाळी अलगरवाडी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.