चाकूर (लातूर) : तालुक्यातील नळेगाव-उदगीर रोडवरील टोलनाक्याजवळ १० टन गोवंश मांसाची अवैध वाहतूक करणारा आयशर ट्रक पोलिसांनी मंगळवारी (दि. १०) सकाळी १०.१५ वाजता पकडला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनास्थळावरून दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नळेगाव-उदगीर रोडवरून गोवंश मांसाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला असता, एम. एच. १७सी. व्ही. ३५४९ क्रमांकाचा आयशर ट्रक संशयास्पद रित्या येताना दिसला. पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता, त्यात १० टन गोवंश मांस आढळून आले. गोवंश हत्या व मांस विक्रीस बंदी असतानाही ही वाहतूक केली जात होती.
याप्रकरणी ट्रकसह नदीम खान मोहम्मद (रा. नाईकवाडापूर, संगमनेर, जि. अहिल्यानगर) आणि फारुख कसम शेख (रा. कसम यासीन शेख चाळ, कुर्ला वेस्ट, मुंबई) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितले की, हे गोवंश मांस मंजूर बशीर कुरेशी (रा. उदगीर, जि. लातूर) आणि मुज्जिद कुरेशी (रा. औसा, जि.लातूर) यांचे आहे.
याप्रकरणी कृष्णा धनराज जाधव (रा. लातूर) यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी दुपारी १.३० वाजता महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमानुसार चौघांविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आर. टी. चव्हाण हे करत आहेत.
संगमनेर, मुंबई ते लातूर कनेक्शन !
या कारवाईत पकडलेला चालक नदीम खान हा संगमनेरचा (जि. अहिल्यानगर) तर दुसरा आरोपी मुंबईचा आहे. तसेच ज्यांचे मांस आहे, ते मुख्य आरोपी उदगीर आणि औसा येथील आहेत. त्यामुळे या तस्करीचे जाळे राज्यभर पसरले असल्याचे दिसून येते. मराठवाड्यातून गोवंश कत्तल करून ते मांस मुंबई व इतर मोठ्या शहरांत पाठवणारी मोठी आंतरजिल्हा टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होत आहे.