उदगीर : उदगीर येथे २०२१ साली शेतीच्या वादातून घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी उदगीर जिल्हा व सत्र न्यायालयाने आज महत्त्वाचा निकाल दिला. न्या. डी. बी. म्हालटकर यांनी या प्रकरणातील ३ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर २ महिला आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
दि. ११ फेब्रुवारी २०२१ रोजी शेतीच्या वादातून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत खळबळजनक घटना घडली होती. फिर्यादीचे चुलते व मेव्हणे यांचा खून करण्यात आला. आरोपी बालाजी जगताप, अंकुश जगताप, लहू जगताप, फुलाबाई जगताप आणि पुजा जगताप यांनी संगनमत करून गोविंद जगताप व नितीन फावडे यांचा खून केला. तसेच भगवान जगताप यांच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी जनाबाई बिरादार यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षाकडून एकूण २१ साक्षीदार तपासण्यात आले, तर बचाव पक्षातर्फे ६ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. साक्षीपुरावे, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल आणि इतर कागदपत्रे ग्राह्य धरून न्यायालयाने निकाल दिला.
सहा. सरकारी वकील शिवकुमार एम. गिरवलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्या. म्हालटकर यांनी खालील शिक्षा सुनावल्या: १. बालाजी जगताप २. अंकुश जगताप ३. लहू जगताप, सर्व रा. हेर, ता. उदगीर कलम ३०२ भादंवि अन्वये जन्मठेप कलम ३०७ प्रमाणे १० वर्षे सश्रम कारावा कलम ३२४ प्रमाणे १ महिना सश्रम कारावास एकूण ६ हजार रुपये दंड निर्दोष तर फुलाबाई जगताप आणि पुजा जगताप या दोन महिला आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकार पक्षाचे वकील या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. शिवकुमार एम. गिरवलकर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. आर. पी. गंभीर आणि कोर्ट पैरवी अधिकारी पोहेकॉ. ४८ अक्रम शेख यांनी सहकार्य केले. पाच वर्षांपूर्वी घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने उदगीर तालुका हादरला होता.