अहमदपूर : अहमदपूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ॲड.स्वप्नील महारूद्र व्हत्ते हे विजयी झाले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय बळवंत मिरकले यांचा ७१८ मतांनी पराभव केला आहे. अभय बळवंत मिरकले यांना ८६७२ मते मिळाली आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शेख कलिमोद्दीन अहमद हकीम हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले असून ७६९९ अशी लक्षणीय मते मिळाली आहेत.
२०२५ च्या 'या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १६ उमेदवार विजयी झाले असून त्याखालोखाल भाजपाचे ३, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३ तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे २ तर शिवसेनेचा १ उमेदवार विजयी झाला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मात्र खातेही उघडता आले नाही. यामुळे पालिकेत सत्ता जरी राष्ट्रवादी असली तरी नगराध्यक्ष भाजपाचा राहणार आहे.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा मतदारसंघ म्हणून संपुर्ण राज्याचे लक्ष असलेल्या या नगरपरिषदेत जागावाटपावरून सत्तेत असलेल्या भाजपाची व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती होऊ शकली नव्हती.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी मित्रपक्षाच्या सहकार्याने नगराध्यक्ष पदासाठी माजी उपनगराध्यक्ष अभय बळवंत मिरकले यांना उमेदवारी देत २५ जागांवर उमेदवार उभे केले होते. तर जागावाटपावरून वितुष्ट आलेल्या भाजपाने नगराध्यक्ष पदासाठी ॲड.स्वप्नील महारूद्र व्हत्ते या हिंदुत्व विचारसरणीतील नवख्या उमेदवारास उमेदवार देत व नगरसेवक पदासाठी १९ जागा लढवत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न केला होता.
तर दुसरीकडे माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महाविकास आघाडीतील घटक पक्षातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष यांची मोट बांधून महाविकास आघाडीचा उमेदवार रिंगणात उभा केला होता. पण ऐनवेळी त्या उमेदवाराने निवडणुकीत माघार घेतल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शेख कलिमोद्दीन अहमद हकीम यांना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात होते.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत प्रचाराच्या दरम्यान राज्यातील अनेक नेत्यांनी हजेरी लावली. उमेदवारांनी व त्यांच्या नेत्यांनी आपल्याच पक्षाचा नगराध्यक्ष उमेदवार व नगरसेवक निवडून यावीत यासाठी जीवाचे रान केले. दि.२ डिसेंबर रोजी मतदान झाले होते दि.३ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी मा.न्यायालयाच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात आली होती. दि.२१ डिसेंबर रोजी शहरातील डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सकाळी दहा वाजता सुरू करण्यात आली होती. प्रारंभी पासूनच भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ॲड.स्वप्नील व्हत्ते हे आघाडीवरच होते पाचव्या फेरीअखेर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नगरसेवक पदाच्या उमेदवारास तिसऱ्या व चौथ्या फेरीत चाहूल लागत होती.