शिरूर अनंतपाळ येथे महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन Pudhari
लातूर

LPG Price Hike | गॅस दरवाढीविरोधात महाविकास आघाडी आक्रमक; शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन

तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

Latur MVA Protest

शिरूर अनंतपाळ : केंद्र सरकारने घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात केलेल्या वाढीविरोधात तसेच गॅस बुकिंगच्या मुदतीत वाढ करण्याच्या निर्णयाविरोधात शिरूर अनंतपाळ येथे महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार अमित देशमुख आणि खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या सूचनेनुसार शिरूर अनंतपाळ शहर व तालुका काँग्रेस कमिटी तसेच महाविकास आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, जनतेच्या भावना महामहिम राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.

गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आधीच नापिकी आणि शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी तसेच सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत गॅस दरवाढ आणि बुकिंगची मुदत वाढविण्याचा निर्णय हा जनतेवर अन्याय असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

या दरवाढीमुळे प्रत्येक कुटुंबावर विपरीत परिणाम होणार असून ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवणाऱ्या शासनाने जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवाळे यांनी केला. तसेच सरकारने तात्काळ गॅस दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी दिला.

या वेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य माणिक गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवाळे, चेअरमन रामकिशन गड्डीमे, संजय बिराजदार, शहराध्यक्ष अशोक कोरे, नगरसेवक सुधीर लखनगावे, अकबर तांबोळी, बाबुराव तोरणे, गुरुनाथ अचवले, व्यंकट कल्ले, मारोती वाघमारे, महेश भिंगोले, नागनाथ सोनकांबळे, हनुमंत चांमले यांच्यासह काँग्रेस व महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT