लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या 70 जागांसाठी 15 जानेवारी रोजी 375 केंद्रांवर मतदान होणार आहे. निवडणुकीत एकूण 3 लाख 21 हजार 354 मतदारांची नोंद आहे. नियोजनासाठी 27 कक्ष स्थापन करण्यात आले असून निवडणूक कामाकरिता 1652 कर्मचारी तसेच बीएलओसह 2500 कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त मानसी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 14 जानेवारी रोजी कर्मचाऱ्यांना तिसरे प्रशिक्षण देऊन निवडणूक साहित्यासह मतदान केंद्रांकडे कर्मचारी मार्गस्थ होतील.
त्यांच्या वाहतूक व्यवस्थेसाठी 133 वाहने ( सिटी बस -73) (क्रूझर 60) दिली जाणार असून सर्व वाहनांना जीपीएस बसविण्यात येईल. असे सांगून आयुक्त मानसी म्हणाल्या, सर्व मतदान केंद्रावर आरोग्य सेविका नियुक्त करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक आरोग्य सेविकेकडे प्राथमिक तपासणीचे किट देण्यात आले. दिव्यांगांकरिता मतदान केंद्रावर व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत मतदान करणारे मतदार व निवडणूक कर्मचारी वगळता इतर कोणालाही थांबता येणार नाही.
कोणतेही प्रचार साहित्य, झेंडे, बॅनर, पोस्टर किंवा चिन्ह 100 मीटरच्या आत दाखवणे कडक मनाई आहे. उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी (अधिकृत ओळखपत्र असलेले) सोडून इतर कुणालाही परिसरात अनावश्यक फिरता येणार नाही. मतदान केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गर्दी करणे मनाई आहे. दरम्यान, मतदानावेळी 6 आदर्श मतदान केंद्र, 3 सखी मतदान केंद्र, दिव्यांग मतदान केंद्र, दोन पर्यावरण पूरक मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.
150 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग
99 संवेदनशील केंद्र व उर्वरित बहुकेंद्र असलेले ठिकाणी बाहेरच्या बाजूस 51 असे 150 ठिकाणी वेब कास्टिंग सुविधा होणार आहे. नियंत्रण कक्ष तयार केला आहे व निवडणूक निर्णय अधिकारीनिहाय कार्यालयात त्याचा एक्सेस दिला आहे.