मनपा निवडणूक बंदोबस्तासाठी 1313 पोलिस फोर्स pudhari photo
लातूर

Latur Municipal Election : मनपा निवडणूक बंदोबस्तासाठी 1313 पोलिस फोर्स

लातूर : पोलिस 24 तास सज्ज; मतदान केंद्रांचे संवेदनशीलतेनुसार वर्गीकरण

पुढारी वृत्तसेवा

लातूर : लातूर महापालिकेच्या निवडणूक महासंग्रामात 70 जागांसाठी विविध राजकीय पक्षांचे व अपक्ष अशा एकूण 259 उमेदवारांमध्ये लढाई होत आहे. 15 जानेवारी रोजी मतदान व दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.

लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेल्या या निवडणुकीत भीतीशिवाय, दबावाशिवाय शांत आणि भयमुक्त वातावरणात मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध व व्यापक पोलिस बंदोबस्ताची रचना केली आहे. संपूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज झाली आहे.

संपूर्ण लातूर महानगरपालिका क्षेत्रात एकूण 18 प्रभाग असून 142 इमारतींमध्ये 375 मतदान केंद्रे आहेत. सर्व मतदान केंद्रांचे संवेदनशीलतेनुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. सामान्य, संवेदनशील व अतिसंवेदनशील अशा वर्गवारीनुसार बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी धोका अधिक आहे त्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त, एसआरपीएफ तुकड्या, विशेष गस्त पथके व जलद प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांसोबतच स्ट्राँगरूम, मतमोजणी केंद्र, प्रमुख चौक, मुख्य मार्ग, बाजारपेठा व गर्दीची ठिकाणे या सर्व ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर सायबरची करडी नजर

संशयास्पद पोस्ट, व्हिडिओ किंवा मेसेज आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. धार्मिक किंवा जातीय भावना भडकवणारे संदेश, आचारसंहितेचा भंग करणारी, तणाव वाढविणारी किंवा अफवांवर आधारित सामग्री शेअर करू नये. फेक न्यूज, खोट्या बातम्या, कटिंग्स किंवा एडिटेड व्हिडिओवर विश्वास ठेवू नये. निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार, दबाव, धमकी, पैशाचा किंवा शक्तीचा गैरवापर अथवा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.

आचारसंहिता भंग, गुन्हे दाखल

आचारसंहिता भंग अनुषंगाने पोलिस ठाणे एमआयडीसी येथे 1, पोलिस ठाणे विवेकानंद येथे 1, पोलिस ठाणे गांधी चौक येथे 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीसंदर्भात पोलिस ठाणे एमआयडीसी येथे 1 व गांधी चौक येथे 3 अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी 6 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. दारूबंदी नियमांंतर्गत 40 गुन्हे दाखल करण्यात आली आहे. तसेच 574 व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

डीवायएसपी प्रत्यक्ष फिल्डवर उतरणार

लातूर शहरातील गांधी चौक, शिवाजीनगर, एमआयडीसी व विवेकानंद या पोलिस स्टेशनकरिता प्रत्येकी एक उपविभागीय पोलिस अधिकारी नियुक्त केले आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी स्वतः प्रत्यक्ष फील्डवर उतरून परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहेत. निवडणूक काळात विशेष गस्त पथके दिवसरात्र कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र व संवेदनशील परिसरात पोलिस नियुक्त आहेत.

असा आहे तगडा बंदोबस्त

  • 6 पोलिस उपअधीक्षक

  • 79 पोलिस निरीक्षक, सपोनि व पीएसआय

  • 713 पोलिस अंमलदार

  • 450 होमगार्ड जवान

  • एसआरपीएफचे 2 सेक्शन (3 अधिकारी व 62 जवान)

  • महिला सुरक्षिततेसाठी स्वतंत्र महिला पोलिस पथक

  • संपूर्ण यंत्रणा 24 तास असणार कार्यरत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT