Latur Municipal election News : मनपाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर File Photo
लातूर

Latur Municipal Election : मनपाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर

एकूण प्रभाग 18 आरक्षण सोडत

पुढारी वृत्तसेवा

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत महापालिकेच्या सभागृहात आयुक्त मानसी मीना यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी ११ वाजता चिठ्ठी पद्धतीने काढण्यात आली. एकूण १८ प्रभागांमधील ७० जागांचे आरक्षण करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण १२ जागा व त्यातील महिलांसाठी सहा जागा राखीव, अनुसूचित जमातीसाठी एक, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण जागा १८ त्यापैकी नऊ जागा महिलांसाठी राखीव, तर सर्वसाधारण एकूण ३९ जागांपैकी २० जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या.

लातूर शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७ सालच्या चार सदस्य पद्धतीने एकूण १८ प्रभागांमध्ये होणार आहे. प्रभाग एक ते १६ मध्ये प्रत्येकी चार सदस्य व प्रभाव १७ आणि १८ मध्ये प्रत्येकी तीन सदस्य असणार आहेत.

  • अनुसूचित जाती पुरुष ६ व महिला ६,

  • अनुसूचित जमाती १

  • ओबीसी पुरुष ९ व महिला ९

  • खुला प्रवर्ग पुरुष १९ व महिला २०

२०११ च्या जनगणनेनुसार ३ लाख ८२ हजार ९४० मतदार संख्या आहे तर अनुसूचित जातीची लोकसंख्या ६७,४७४ व अनुसूचित जमातीची लोकसंख्या ५५० एवढी आहे, अशी माहिती आरक्षण काढण्यापूर्वी अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव व उपायुक्त डॉ पंजाबराव खानसोळे यांनी दिली. चार जागा असलेल्या प्रभागात दोन जागा महिलांसाठी राखीव करण्यात आले आहेत तर तीन जागा असलेल्या एका प्रभागामधील दोन जागा महिलांकरिता राखून ठेवण्यात आल्या. अनुसूचित जातीचे आरक्षण या अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार उतरत्या क्रमाने करण्यात आले. तसेच अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या टक्केवारी नुसार एक जागा राखीव ठेवण्यात आली. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी असलेल्या १८ जागांपैकी नऊ जागांचे एक ते अठरा प्रभागांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे वाटप करण्यात आले.

तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती महिलांच्या जागा आरक्षित झाल्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांकरिता नेमून द्यावयाच्या उर्वरित नऊ जागांपैकी थेट आरक्षण देण्यात आले. तसेच सर्वसाधारण महिलांच्या जागा आवश्यक असलेल्या संख्येइतक्या राखीव ठेवण्यात आल्या. हे आरक्षण मनपा शाळेतील तीन विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT