चाकूर : लातूर रोडलगत असलेल्या शिवारात रेल्वेपटरीलगत असलेल्या विहिरीत मंगळवारी (दि.४) एकाचा मृतदेह आढळून आला. परमेश्वर भगवानराव बोन्दरे (वय ३९, रा. नेत्रगाव ता. उदगीर) असे मृताचे नाव आहे.
परमेश्वर हे शनिवारपासून बेपत्ता होते. कुटुंबाकडून त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान मंगळवारी (दि.४) लातूर रोड येथील तेलंगे यांच्या शेतातील विहिरीत शेतकरी पिरखा लालाखा पठाण यांना मंगळवारी सकाळी १० वाजता त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच एएसआय दत्तात्रय लांडगे, ईश्वर स्वामी, सुग्रीव मुंढे,पोलीस अंमलदार नागनाथ कातळे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. पोलीस अंमलदार नागनाथ कातळे यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमेश्वर यांना पोहता येत असल्याची माहिती वडील भगवान बोन्दरे यांनी दिली. त्यामुळे परमेश्वर बोन्दरे यांच्या मृत्यूबद्दल घातपात असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.