औसा : औसा शहरातील एका गोडावूनला मंगळवारी (दि.१) भीषण आग लागली. या आगीत गोडावूनमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.
शहरातील नाथ नगर परिसरात आज मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास केदारनाथ मंगल कार्यालयाच्या पाठीमागील गोडावूनमध्ये लातूर येथील पाईपलाईन ठेकेदाराचे साहित्य ठेवले होते. त्या ठिकाणी भीषण आग लागून सगळे साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले. सदरील जागेत कोणतीच सुरक्षा यंत्रणा नसल्याने हलगर्जी व निष्काळजीपणामुळे तेथे ठेवलेल्या साहित्यास भीषण आग लागल्याने ठेवलेले सर्व साहित्य जळून खाक झाले.
या घटनेची माहिती मिळताच औसा नगर पालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. तरी आगीवर नियंत्रणासाठी यंत्रणा अपुरी पडत असल्याने व आगीस आटोक्यात आणण्यासाठी थोडा उशीर होत असल्याने निलंग्याहूनही अग्निशमन दल मागवून आग आटोक्यात आणली गेली. याबाबत औसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, याबाबत औसा पोलिस तपास करीत आहेत.