Jalkot Wall Collapse Farmer Death
जळकोट : आगामी खरीप पेरणीच्या तयारीसाठी घरात बी-बियाण्यांची जुळवाजुळव करत असताना घराची भिंत अंगावर कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या शेतकरी रामराव सटवाजी शिंदे (वय ७५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे जळकोट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ जून रोजी रामराव शिंदे हे पेरणीपूर्व तयारी म्हणून घरात बी-बियाण्यांची व्यवस्था करण्यात व्यस्त होते. परवाच्या पावसामुळे घराची दगड-मातीची भिंत भिजून फुगली होती. काम सुरू असतानाच ही भिंत अचानक त्यांच्या अंगावर कोसळली. त्यामुळे ते भिंतीखाली दबले जाऊन गंभीर जखमी झाले.
बराच वेळ ते दिसत नसल्याने त्यांच्या पत्नीला संशय आला. त्यांनी व सोबत काम करणाऱ्या व्यक्तीने आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने रामराव शिंदे यांना भिंतीखालून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने जळकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातात त्यांचा एक पाय पूर्णपणे मोडला होता, तर दुसऱ्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झाले होते. हात मोडण्यासह डोक्यालाही गंभीर दुखापत झाली होती. संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
जळकोट येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना उदगीर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून पुढील उपचारांसाठी लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह जळकोट येथे आणण्यात आला. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामराव शिंदे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. ते शेतीनिष्ठ व कष्टाळू शेतकरी म्हणून परिचित होते. ग्रामीण भागातील तंटामुक्ती मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच ते माजी ग्रामपंचायत सदस्यही होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे ते एकमेव कमावते सदस्य होते.
या दुर्घटनेमुळे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असून शासनाने त्यांच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत द्यावी तसेच कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी नातेवाईक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.