निलंगा, पुढारी वृत्तसेवा : जाजनूर गाव ते शेख वस्ती पासून निलंगा शहराकडे जाणारा जुना रस्ता मोजणी करून खुला करून देण्यात आला. तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहमतीने मागील ४० वर्षांपासून वादात असलेला हा शेतरस्ता खुला केला. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जाजनूर स्मशानभूमीपासून सावनगिरा- तळीखेड जाणारा रस्ता मजबुती करणाच्या कामाची सुरवात तहसीलदार यांनी पाहणी केली. तसेच गावातून शेख वस्तीकडे जाणारा गावठाणलगतचा रस्ता शेतकरी वादात प्रलंबित होता. गावठाणा लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या हद्दी खुणा कायम करून देण्यात आल्या व त्यानंतर जाजनूर लांबोटा शिव ते अंबुलगा साखर कारखाना जाणाऱ्या रस्त्यावरील पुल टाकण्याचे काम काही कारणास्तव रखडले होते. तेथे तहसीलदार स्वत: उपस्थित राहून दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना रस्त्याचे महत्व पटवून दिले. व पूलाचे रखडलेले काम पूर्ण करून घेतले.
याकामी निलंगा मंडळ अधिकारी राजकुमार देशमुख, जाजनूर ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पद्माकर रत्नपारखे, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) निलंगा सदानंद सागावे, भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी प्रशांत गाडेकर, पोलीस कर्मचारी गोपाळ बरडे, जाजनूर गावचे सरपंच काशिनाथ गोमसाळे, माजी सरपंच बालाजी गोमसाळे, तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम गोमसाळे, तंटामुक्ती उपाध्यक्ष इकबाल सय्यद, अरविंद पाटील, विनायक गोमसाळे, चांद शेख आदीसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.