चाकूर तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे Pudhari Photo
लातूर

Latur Heavy Rain|चाकूर तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा, २०० घरांची पडझड, शेतकऱ्यांना मोठा फटका

सामान्य नागरिकांचे अतोनात आर्थिक नुकसान : शासनाकडून मदतीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

संग्राम वाघमारे

चाकूर : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसला असून तालुक्यातील अनेक भागातील शेतकरी, सामान्यांना फटका बसला आहे. विविध गावांतील २०० घरांच्या भिंती कोसळून पडझड झाल्याने सामान्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे, दरम्यान नुकसान झालेल्या नागरिकांना आर्थिक भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

चाकूर तालुक्याला बुधवार २७ ते २९ ऑगस्ट दरम्यान पावसाच्या मुसळधार आणि संतातधारीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना तडाखा बसला आहे. यामध्ये तालुक्यातील झरी बु.येथील ०६, नायगाव ०५,हाडोळी २४, रोहिणा ०४, घरणी १७, शेळगांव १७, जढाळा ११, मष्णेरवाडी ०८, बेलगाव ०३, हिंपळनेर ०५, वडगाव एक्की ०६, कलकोटी १४, दळवेवाडी ०२, सांडोळ ०२, रामवाडी ०१, उजळंब ०५, कबनसांगवी ०१, कडमुळी ०१, सुगाव ०३, दपक्याळ ०१, कवठाळी ०१, राच्चनावाडी ०८, देवांग्रा ०१, देवांग्रवाडी ०१, रायवाडी ०२, अजनसोंडा खु.०१, अजनसोंडा बु. ०१, कबनसांगवी ०१, मोहनाळ ०१, आनंदवाडी १०, डोंग्रज ०४, माहूरवाडी ०२, चाकूर शहर ०७, हणमंत जवळगा ०३, आटोळा ०१, घारोळा ०१, महांडोळ ०२, बनसावरगाव ०१ आदी गावातील जवळपास २०० नागरिकांच्या घरांच्या भिंती मुसळधार पावसाने कोसळल्यामुळे सामान्यांच्या घराचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या पावसाने शेतकऱ्यांची खरीपाची उभी पीके आडवी झाल्यामुळे शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

संततधारीमुळे तालुक्यातील २०० घरांची पडझड झाली असल्याची माहिती नैसर्गिक आपत्ती विभागाने दिली आहे. आणखीन काही नागरिकांनी त्यांच्या घराची पडझड झाल्याचे तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाला कळविले नाही. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे सोमवारी आणखीन आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसाने नागरिकांच्या कच्च्या घरांच्या पडझडीची ग्राम महसूल अधिकारी यांनी पाहणी करून प्राथमिक अहवाल तहसील नैसर्गिक आपत्ती विभागाकडे पाठविले आहे. दरम्यान तहसीलदार यांनी संबंधित विभागाकडे नुकसानीचे मूल्यांकन करून नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करुन तात्काळ शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तालुक्यातील शिरनाळ येथील नदी काठावरील जवळपास १० शेतकऱ्यांच्या उभ्या सोयाबीन पिकात गुडघ्याएवढे पाणी थांबल्याने पिके पूर्ण पणे पाण्याखाली गेली आहेत, तर काही पिके वाहून गेले असल्यामुळे त्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी नारायण गोलावार यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT