औराद शहाजानी: औराद शहाजानीसह परिसरात सोमवारी (दि.२२, सप्टेंबर) सायंकाळी एक तासात ५६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. दुपारी १२:०० वाजता हलक्या पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर १:०० ते २:०० वाजेपर्यंत अत्यंत जोराचा पाऊस झाला.
रविवारी सायंकाळी एक तासात ६४ मिलीमीटर पाऊस झाला. यात शेतीचे मोठे नुकसान झाले होते. आज पुन्हा सोमवारी अतिवृष्टीने परिसराला झोडपले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिपावसाने हिरावून घेतला आहे. अनेक शेतकऱ्यांचे पावसाने बांध फुटले असून अनेकांच्या शेतातील पिके व माती वाहून गेली आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामामुळे गावाच्या दक्षिणेकडून येणाऱ्या पाण्याला अडसर होऊन सर्व पाणी महामार्गावरून वाहत आहे. पावसाच्या जोरामुळे अनेक घरे व दुकानात पाणी शिरले होते. तसेच लातूर -हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरूनही पाणी वाहत होते. औराद गावातील अनेक ओढ्या-नाल्यांना पाणी आल्याने औराद गावात येणारी वाहतूक काही काळ बंद झाली होती. तगरखेडा - औराद शहाजानी, वांजरखेडा - औराद शहाजानी या रस्त्यावरील पूलावरून पाणी जात असल्याने हा रस्ता बंद होता.
माकणी व धनेगाव धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात ये असल्यामुळे मांजरा व तेरणा नदी दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे रात्रीच औराद शहाजानी व तगरखेडा येथील बंधाऱ्याचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तेरणा नदीवरील अनेक पुलावरून पाणी जात असल्याने येळणूर-निलंगा, सावरी-मानेजवळगा, बडुर-कासार बालकुंदा, टाकळी या गावांचा संपर्क तुटला आहे.