Latur News : मूक-शक्तीचा विसर्जन मिरवणुकीत घुमला आवाज  File Photo
लातूर

Latur News : मूक-शक्तीचा विसर्जन मिरवणुकीत घुमला आवाज

लातूर : दिव्यांगांचे ढोल पथक; शब्दाविना व्यक्त होणारे सूर

पुढारी वृत्तसेवा

Latur Ganesh Visarjan Procession

लातूर, पुढारी वृत्तसेवा : यंदा आवाज कानावर नव्हे मनावर' या थीम वर आधारीत लातूरातील दिव्यांग विध्यार्थ्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकाद्वारे आपली कला सादर करीत शब्दाविना सूर घुमविला.

बाप्पा गणेश मंडळ व जीवन विकास प्रतिष्ठान संचलित ड. विजयगोपाल अग्रवाल मूकबधिर विद्यालयातील २५ विद्यार्थ्यांच्या दिव्यांग चमूने शनिवारी झालेल्या बिसर्जन मिरवणुकीत ढोल पथकाच्या गजरात आवाज दणाणून सोडला होता. बोलताही येत नाही, त्यातच कानावर धड आवाजही पडत नाही अशा दिव्यांग मुलांनी या मिरवणुकीत दमदार ढोल पथकाचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

गंजगोलाईतून निघालेल्या या मिरवणुकीत दिव्यांग विद्यार्थ्यांनी गोलाईसह भुसार लाईन, सुभाष चौक, दयाराम रोड या ठिकाणी ठेका धरत मुकशक्तीची ताकद दाखविली. या पथकाला क्रीडा शिक्षक महेश पाळणे, नंदकुमार थडकर, बाप्पा गणेश मंडळाचे ढोल पथक प्रमुख विनय कलशेट्टी, अभिषेक राजपूत, शार्दूल ईटकर, आलोक वलाकट्टे, ऋषिकेश लांडगे, आदित्य कांबळे, अभय ढगे यांचे मार्गदर्शन लाभले. दिव्यांगाच्या या कलेचे समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशटवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा सक्षमीकरण अधिकारी राजू गायकवाड, सहाय्यक सल्लागार बालासाहेब वाकडे, जीवन विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयसिंहराव देशमुख, रामानुज रांदड, अभय शहा, जयप्रकाश अग्रवाल, संजय निलेगावकर, बाप्पा गणेश मंडळाचे अध्यक्ष आशिष महिंद्रकर, मार्गदर्शक आनंद राचट्टे, प्र. मुख्याध्यापक संतोष देशमुख, श्रीकृष्ण लाटे यांनी कौतुक केले.

दीड महिन्यापासून सराव...

गेल्या दीड महिन्यापासून ही मुले विसर्जन मिरवणुकीसाठी ढोल पथकाचा सराव करीत होते. त्यांचा सरावही विशेष होता. सांकेतिक भाषेतून या विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षक व वाप्पा गणेश मंडळाच्या ढोल पथकाच्या चमूने यांना मार्गदर्शन केले. कानावर आवाज घुमत नसला तरी इशाराच्या भाषेवर या विद्यार्थ्यांनी ढोलवर ठेका धरला होता. बाप्पा गणेश मंडळाच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील दिव्यांगाच्या ढोल पथकाचा हा पहिलाच प्रयोग होता व तो यशस्वी ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT