Latur farmer bull viral video
लातूर : लातूरमधील एका शेतकऱ्याला सरकारकडून देण्यात आलेला बैल आजारी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याला उद्या त्याच्या पसंतीनुसार नवीन बैल खरेदी करून देण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा लातूर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांचा एक बैल वीज कोसळल्यामुळे मृत्युमुखी पडला होता. त्यानंतर 9 जून रोजी एका बैलाच्या जागी पत्नीला औताला जुंपून त्यांनी शेतीची मशागत केली होती. 10 जून रोजी याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.
या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मदत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शेतकऱ्याला एक बैल देण्यात आला. मात्र, हा बैल आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा लातूर जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देत शेतकऱ्याला त्याच्या पसंतीनुसार नवीन बैल खरेदी करून देण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
पशुसंवर्धन विभागाने 10 जून रोजी तातडीची मदत म्हणून या शेतकऱ्याला एक बैल उपलब्ध करून दिला होता. मात्र, मदतीसाठी देण्यात आलेला हा बैल अवघ्या दोन दिवसांत शेतातील मशागतीदरम्यान खाली बसला आणि आजारी पडला. पशुवैद्यकीय तपासणीत तो बैल आजारी असल्याचे निष्पन्न झाले.
परिणामी, मदत मिळण्याऐवजी शेतकऱ्यावर त्या बैलाच्या उपचारांचा खर्च करण्याची वेळ आली. मात्र, सुदैवाने शासनाने या प्रकरणाची पुन्हा एकदा गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला उद्या त्याच्या पसंतीनुसार नवीन बैल खरेदी करून देण्यात येणार असून, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लातूर जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक आदेशही दिले आहेत.