Latur farmer protest renapur tahsil office
रेणापूर, पुढारी वृत्तसेवा २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे सोयाबीन भिजत आहे. त्यातच आता शेतकऱ्यासमोर मोठ्या शंखी गोगलगायीचे संकट उभे ठाकले आहे. तुरी, हरभरा, करडई व इतर रब्बी हंगामातील पिकांवर तसेच ऊसावर मोठ्या शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गजानन बोळंगे व इतर शेतकऱ्यांनी शेतातील गोगलगायी जमा करून तहसील कार्यालयाच्या गाभाऱ्यात आणून टाकल्या व खराब सोयाबीनची होळी करून शासनाचा जाहिर निषेध केला.
नव्याने पेरणी केलेल्या पिकांवर पाणी साचल्याने ती पूर्णपणे नष्ट झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न हातातून निसटल्याने त्यांच्यावर हतबलतेची वेळ आली आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आथिर्क मदत करावी अशी मागणी रेणापूर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गजानन बोळंगे यांनी केली आहे. गुरुवारी ३० ऑक्टोबर रोजी पोत्यात भरून आणलेल्या शंखी गोगलगायी तहसीलच्या गाभाऱ्यात टाकुन सोबत आणलेले सोयाबीन पेटवुन दिले.
यावेळी बोळंगे यांनी शासनाच्या विरोधात घोषणा देवुन शासनाच्या धोरणांचा निषेध केला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई जमा करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. खलंग्री, व्हटी व इतर परिसरात शेतावर पसर-लेल्या शंखी गोगलगायीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा शेतकरी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी व्हटी व खलंग्री भागातील गणेश सुरवसे, दिलीप बोकडे, सदाशिव सुर्यवंशी, रंगनाथ झुलपे, प्रल्हाद सुरवसे, शेतकरी उपस्थित होते.