मांजरा नदीलगतच्या शेतीचे नुकसान Pudhari News Network
लातूर

Latur Farmer News : अडीच हजार शेतकऱ्यांच्या आठशे हेक्टरवरील माती गेली खरडून

रेणापूर : पीक येणे अशक्य; अनुदानाचाही हवा आधार

पुढारी वृत्तसेवा

रेणापूर (लातूर ) : विठ्ठल कटके

रेणापूर तालुक्यात मे ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीने खरीपाचे मोठे नुकसान झाले आहे. मांजरा व रेणा नदीकाठच्या २६ गावापैकी २२ गावांतील अडीच हजार शेतकऱ्यांच्या आठशे हेक्टर जमिनीवरील माती खरडुन ती वाहुन गेली आहे. काही ठिकाणी जमिनी खचल्या आहेत तर कांहीं ठिकाणीं मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या जमिनीवर पीके घेणे शेतकऱ्यांना शक्य नाही. खरडून गेलेल्या जमिनी दुरुस्त करण्यासाठी व शेतावर नव्याने माती टाकण्यासाठी आर्थिक मदत करावी. अशी मागणी शेतकरी करीत आहेत. बाधीत शेतकऱ्यांना दिवाळीला अनुदान मिळेल अशी अपेक्षा होती परंतु बहुतांश शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही.

मांजरा नदीच्या काठालगत असलेल्या पोहरेगावच्या ४०० शेतकऱ्यांचे ८० हेक्टर, डिगोळदेशमुख १९० शेतकऱ्यांचे ८० हेक्टर, डिगोळ देशपांडे १०३ शेतकऱ्यांचे २५ हेक्टर, मोटेगाव १९० शेतकऱ्यांचे ६० हेक्टर, वांगदरी १८० शेतकऱ्यांचे ७० हेक्टर, आरजखेडा २६० शेतकऱ्यांचे ८० हेक्टर, इंदरठाणा ११० शेतकऱ्यांचे ५० हेक्टर, दर्जीबोरगाव ११० शेतकऱ्यांचे ३० हेक्टर, सांगवी ९० शेतकऱ्यांचे ६० हेक्टर, आंदलगाव २४० शेतकऱ्यांचे ५० हेक्टर, हरवाडी ६५ शेतकऱ्यांचे ४० हेक्टर तर रेणा नदीकाठच्या लगत असलेल्या पानगावच्या २५ शेतकऱ्यांचे ३ .६० हेक्टर, कामखेडा २५ शेतकऱ्यांचे ६ हेक्टर , मुसळेवाडी ८ शेतकऱ्यांचे २ हेक्टर, नरवटवाडी ३ शेतकर्यांचे १ हेक्टर, भंडारवाडी १२ शेतकऱ्यांचे २ हेक्टर, घनसरगाव १५ शेतकऱ्यांचे ३ हेक्टर, रेणापूर सज्जा १ च्या १९५ शेतकर्यांचे ५५ हेक्टर, रेणापूर सज्जा - २ च्या ७० शेतकऱ्यांचे २५ हेक्टर, खरोळा ७५ शेतकऱ्यांचे ३९ हेक्टर, जवळगा ५५ शेतकऱ्यांचे २१ हेक्टर, शेलू ३० शेतकऱ्यांचे १५ हेक्टर अशा दोन हजार ४५१ शेतकऱ्यांची ७९७.६० हेक्टर जमीन पाण्याने खरडून गेली आहे. वरील गावे पुरग्रस्त झाली आहेत. अनेक वेळा पुर आल्याने या गावांचा नदीपासून चार ते पाच किलोमिटरचा परिसर पाण्याखालीच होता आजही काहींच्या शेतात जाता येत नाही.

शेती पुर्ववत करण्यासाठी शेतकऱ्यांना नदी नाल्यातील गाळाचा उपसा करून नव्याने शेतावर माती टाकावी लागणार आहे. यासाठी लागणीरी यंत्र सामुग्री, वाहने, इंधन व पैसा आणायचा कोठून असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असुन हातातोंडाला आलेली पीके निसर्गाने हिसकावून घेतली आहेत. हंगाम हातातून गेल्याने तब्बल अडीच हजार शेतकरी हतबल झाले आहेत.

मांजरा व रेणा नदी काठच्या परिसरात रेणापूर तालुक्यातील २६ गावे येतात. त्यातील २२ गावच्या २ हजार ४५१ शेतकऱ्यांचे ७९७. ६० हेक्टर क्षेत्रावरील जमिनी खरडून जाऊन त्या खचल्या आहेत. या बाधित क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी ४७ हजार रुपयांप्रमाणे ३ कोटी ७४ लाख ८७ हजार २०० रुपयांच्या अनुदानाची गरज आहे. दिवाळीला अनुदान मिळेल अशी अपेक्षा होती परंतु काही शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT