Crime pudhari
लातूर

Drug seizure destruction Latur : लातुरात सव्वा कोटीचे अमली पदार्थ नष्ट

पोलिसांची कारवाई ः 713.92 किलो गांजा, 21.200 किलो अफू जाळला

पुढारी वृत्तसेवा

लातूर ः .जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून विविध 45 गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला तब्बल 1 कोटी 18 लाख 27 हजार रुपयांचे अंमली पदार्थ शुक्रवारी कायदेशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीने जाळून पूर्णपणे नष्ट करण्यात आले.

यात 713.92 किलो गांजा, 21.200 किलो अफू आणि 96 ग्रॅम एमडी ड्रग्ज यांचा समावेश होता. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.

लातूर जिल्हा पोलीस दलाने मागील काही महिन्यांत अंमली पदार्थांची लागवड, वाहतूक, विक्री आणि सेवन याविरोधात सातत्याने विशेष मोहिमा राबवत मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या होत्या. त्या कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला गांजा, अफू व इतर अंमली पदार्थ न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यासाठी आवश्यक आदेश प्राप्त करण्यात आले.

त्यानुसार शुक्रवारी सकाळी अधिकृत पंचनामा व कायदेशीर प्रक्रिया करून पंच, समिती सदस्य आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण मुद्देमाल लातूर येथील किर्ती ऑईल मिलच्या फायर बॉयलरमध्ये जाळून नष्ट करण्यात आला.

कारवाईदरम्यान कोणतेही प्रदूषण होऊ नये तसेच परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली होती. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, रासायनिक विश्लेषकांचे पथक, वैध मापन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह प्रभारी पोलीस उपाधीक्षक (गृह) दत्तात्रय निकम, एम. पोलिस ठाण्याचे निरीक्षक समाधान चवरे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस मुख्यालयाचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

तरुणांना व्यसनात अडकवण्याचा प्रयत्न

लातूर जिल्ह्यात मोठ्या संख्येत राज्यभरातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. येथे अंमली पदार्थांचा व्यवसाय चांगला चालू शकतो हे व्यवसाईकांनी ओळखले आहे. तरुणांना हेरुन त्यांना या व्यसनात अडकावण्याचा प्रयत्न होत आहे. अनेक मेडीकल स्टोअर्सवर झालेल्या छापेमारीत नशेच्या गोळ्या मिळाल्या आहेत.

एमडी ड्रग्ज, गांजा, अफू विकताना अनेकांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. चाकूर शहरानजिक एका शिवारात सुरू असलेल्या ड्रग्जच्या कारखान्याची पोलखोल पोलिसांनी केली होती. या अवैद्य धंद्याची पाळेमुळे नष्ट करुन एक सुसंस्कृत जिल्हा म्हणून लातूरची असलेली ओळख जपावी अशी अपेक्षा नागरीक व्यक्त करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT