Latur farmers crisis pudhari photo
लातूर

Latur farmers crisis : बळीराजाच्या काळजातली वेदना शिवेंद्रसिंहराजेंनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली

फडणवीस आज थेट बांधावर; संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची आस

पुढारी वृत्तसेवा

शहाजी पवार

लातूर : आषाढ गेला, श्रावण सरला आणि भाद्रपदही संपत आला तरी लातूरच्या आभाळाने पावसासाठी ओंजळ उघडलेलीच नाही. रानावर उभी असलेली पिके करपून गेली आहेत. जमिनीला भेगा पडल्या आहेत. विहिरी-बोअरने तळ गाठला आहे. नदी-नाले कोरडे पडले आहेत. पाणी आभाळात नाही, जमिनीत नाही, नदी-ओढ्यात नाही... ते आता फक्त शेतकऱ्यांच्या डोळ्यांत उरले आहे.

या काळीज पिळवटून टाकणाऱ्या वास्तवाची पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन दखल घेतली. शेतकऱ्यांच्या डोळ्यांत साचलेली व्यथा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली. त्या वेदनेची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस आज थेट लातूरच्या बांधावर पोहोचत आहेत.

लातूर जिल्ह्याचे अर्थकारण मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहे. सोयाबीन, तूर यांसारखी खरीप पिके म्हणजे शेतकऱ्याच्या वर्षभराच्या संसाराचा आधार. पेरणीयोग्य पाऊस झाला म्हणून बळीराजाने आशेने बियाणे मातीत टाकले. आभाळ साथ देईल, पीक उभे राहील आणि घरचा संसार सुरळीत चालेल, अशी अपेक्षा होती. मात्र पेरणीनंतर पावसाने अशी पाठ फिरवली की शेतकऱ्याच्या आशेवरच विरजण पडले.

गेल्या सुमारे ६० दिवसांपासून पावसाचीप्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी शेतातील पिकांनी माना टाकल्या आहेत. सोयाबीन करपले आहे. कुठे हिरवी धाटे आणि शेंगा काही ठिकाणी दिसत असल्या, तरी त्यात दाणे भरण्याची आशा मावळली आहे. तुरीची वाढ खुंटली आहे. उसाचीअवस्था बिकट झाली आहे. फळबागांनाही पाण्याची चिंता लागली आहे. विहिरी, बोअरवेल आणि बंधारे कोरडे पडल्याने शेतकऱ्यांसमोर खरीप हंगामाबरोबरच रब्बीचीही चिंता उभी ठाकली आहे.

पिकासाठी घेतलेले कर्ज, घरखर्च, मुलांचे शिक्षण, मुलींची लग्ने, जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याची चिंता... संकटांची ही मालिका दिवसेंदिवस लांबत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा केवळ पिकांचा प्रश्न राहिलेला नाही तर त्यांच्या संपूर्ण संसाराच्या अस्तित्वाचाच प्रश्न बनला आहे.या कठीण प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा ऐकल्या. कोरडी शेते, करपलेली पिके, आटलेल्या विहिरी आणि चिंतेने काळवंडलेले शेतकऱ्यांचे चेहरे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले.

या वास्तवाची केवळ पाहणी न करता त्यामागची वेदना त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली. बळीराजाच्या काळजात पेटलेला हा विस्तव शासनाच्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज स्वतः लातूरच्या बांधावर येत आहेत. रयतेचे राजे छत्रपती शिवरायांचे वंशज शिवेंद्रबाबा आमची वेदना जाणतील, आमचा आवाज सरकारदरबारी पोहोचवतील आणि संकटातून सावरण्यासाठी शासनाकडून मदत मिळवून देतील, असा विश्वास लातूरच्या शेतकऱ्यांमध्ये होता.

पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या वेदना प्रत्यक्ष बांधावरून मुख्यमंत्र्यांपर्यंत नेल्याने त्या विश्वासाला बळ मिळाले आहे.आता मुख्यमंत्री बांधावर येत आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाच्या नजरा शासनाच्या मदतीकडे लागल्या आहेत. कागदी सोपस्कार आणि पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत वेळ न घालवता प्रत्यक्ष परिस्थितीची दखल घेऊन लातूरसह मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीसाठी ठोस उपाययोजना व्हाव्यात, पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि आगामी हंगामासाठी आधार मिळावा, असा शेतकऱ्यांचा आर्जव आहे, देवाभाऊ तो पूर्ण करतील असा विश्वासही त्यांना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT