लातूर : मोठ्या आशेने चा़ड्यावरची मुठ सोडलेल्या बळीराजाला यंदाही आबादानीची मोठी आशा होती. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने त्याचे स्वप्न रानावरच खाक झाले. या आपत्तीने तो पुरता धास्तावला मात्र त्याला धीर देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट बांधावर आले.
या आपत्तीने केलेले अन्नदात्याचे हाल, त्याच्यासह माय माऊल्यांच्या डोळ्यात दाटलेले पाणी अन आपला भाऊ म्हणून त्यांनी देवाभाऊंना मारलेली मिठी….या वास्तावाने मुख्यमंत्र्यांसह सारा शिवारही गहिवरला. बळीराजाला धीर देत फडणवीस परतले अन अवघ्या ७२ तासांत लातूर जिल्यातील सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला. संकटाच्या काळात सरकार आपल्या पाठीशी असल्याचा आधार बळीराजाला मिळाला.
जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत झालेली पर्जन्याची तूट आणि अन्य दुष्काळी घटकांचा विचार करून लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी आणि जळकोट या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळाबाबतच्या ‘ट्रिगर-१’ अनुषंगाने पंचनामे करण्यात येणार आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि जीपीएस निर्देशांक संकलित करून पिकांच्या परिस्थितीचा अहवाल तयार केला जाणार आहे.
दुष्काळग्रस्त भागासाठी विशेष सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत. जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात सूट, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांचे निकष शिथिल करून अधिकाधिक कामे सुरू करणे, गरजेनुसार टँकरने पाणीपुरवठा करणे, टंचाई जाहीर केलेल्या गावांतील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज खंडित न करणे, शेतकरी व शेतमजुरांना पुरेसा अन्नधान्य पुरवठा करणे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे आणि जलसंधारणाची कामे सुरू करणे, अशा उपाययोजनांचा त्यात समावेश आहे.
पालकमंत्र्यांनी पालकत्व निभावले, लोकप्रतिनिधी सरसावले
दुष्काळाच्या या आपत्तीने शेतकऱ्यांवर ओढवलेली आपबिती लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गांभीर्याने घेतली व ती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे संवेदनशिलपणे मांडत दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा केला.पालकमंत्र्यांसोबत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेशअप्पा कराड, आमदार संजय बनसोडे, काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि माजी आमदार धीरज देशमुख यांनीही आपापल्या भागातील शेतकऱ्यांचा आक्रोश मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला.