लातूर : जिल्हा रुग्णालयाच्या दारात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, गंभीर आजारांवरील उपचारांसाठी लातूरकरांना अन्य शहरांची वाट धरावी लागू नये, हे स्वप्न आता साकार होण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले आहे. लातूरच्या आरोग्य सुविधांना बळ देणारा श्री महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, लातूर जिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांवरून थेट ३०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यास मंजुरी दिली आहे.
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि त्यांचे प्रयत्न या निर्णयामागे निर्णायक ठरले आहेत. ही केवळ रुग्णालयाच्या खाटांची वाढ नसून, लातूरकरांच्या आरोग्य हक्काला मिळालेली महत्त्वाची भेट आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्री भोसले यांनी रुग्णालयाची क्षमता वाढविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली होती. त्यावेळी दिलेला शब्द त्यांनी विसरला नाही. तांत्रिककारणांमुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेला जिल्हा रुग्णालयाचा प्रश्नमार्गी लावण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
१०० खार्टाच्या रुग्णालयाच्या भूमिपूजनानंतरही त्यांनी खाटांची संख्या वाढविण्याचा विषय शासनाकडे लावून धरला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि ३०० खाटांच्या रुग्णालयाचा मार्ग मोकळा झाला. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०२६ ते २०३१ या कालावधीतील 'प्रगती' प्रकल्पांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.
आशियाई विकास बँकेच्या कर्जातून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाला १५ सप्टेंबरच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.
दिलेला शब्द पाळला, लातूरकरांना दिलासा !
वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न सोडविण्यापासून ते रुग्णालयाची क्षमता तिपटीने वाढविण्यापर्यंतचा प्रवास पालकमंत्री भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची साक्ष देणारा आहे. भूमिपूजनावेळी दिलेली ग्वाही प्रत्यक्ष निर्णयात उतरल्याने लातूरकरांसाठी हा क्षण महत्त्वाचा ठरला आहे. आजारपणाच्या संकटात रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, उपचारासाठी अधिक सुविधा आपल्या जिल्ह्यातच मिळाव्यात, या अपेक्षेला या निर्णयामुळे नवी आशा मिळाली आहे. लातूरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणारी ही भेट निश्चितच जिल्हावासीयांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
२३५ नवीन पदांमुळे आरोग्यसेवेला मनुष्यबळ
रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासोबतच २३५ नवीन पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या २१० पदांसह रुग्णालयाचा एकूण आकृतिबंध ४४५ पदांचा होणार आहे. त्यामुळे रुग्णालयाची क्षमता वाढण्याबरोबरच आरोग्यसेवेसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे लातूर जिल्ह्यातील हजारो रुग्णांना स्थानिक पातळीवरच अधिक दर्जेदार आणि अद्ययावत द्वितीय स्तरावरील आरोग्यसेवा मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. पालकमंत्री भोसले यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आभार मानले आहेत.