Latur DCC Bank Election  
लातूर

Latur DCC Bank Election : चाकूरमध्ये डीसीसी बँक निवडणुकीची उत्कंठा शिगेला, सोसायटी निवडणुकीत चुरस, १०० टक्के मतदान!

सोमवार १६ नोव्हेंबर रोजी निकाल

पुढारी वृत्तसेवा

चाकूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी चाकूर तालुक्यात १०० टक्के मतदान झाले.अत्यंत अटीतटीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडली असून या निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. दरम्यान सोसायटी निवडणुकीत ४२ पैकी ४२ मतदारांनी मतदान केल्यामुळे या निवडणुकीत अतिशय चुरस वाढलेली पहायला मिळाली.

चाकूर तहसील कार्यालयात सकाळी ८ वाजता सुरु झालेल्या या मतदानात विविध प्रवर्गातील एकूण ६६ मतदारांपैकी सर्वच्या सर्व ६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने शंभर टक्के मतदानाची नोंद झाली. या निवडणुकीने तहसील कार्यालय परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले.

या निवडणुकीत राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सहकार पॅनलकडून संतोष पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. त्यांच्या विरोधात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनलचे डॉ. गोविंदराव माकणे उभे आहेत. दोन्ही बाजूंच्या पॅनलचे राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी तहसील कार्यालयाबाहेर मोठी उपस्थिती लावली होती. मतदानाच्या प्रत्येक घडामोडीकडे दोन्ही गटांचे लक्ष लागले होते.

विशेष म्हणजे, दोन्ही उमेदवारांसाठी ही पहिलीच निवडणूक असली तरी या लढतीत सहकार क्षेत्रासह स्थानिक राजकारणातील अनेक गणिते गुंतली आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ बँकेच्या संचालकपदापुरती मर्यादित न राहता चाकूर तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे.

या निवडणुकीत प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच धान्य अधिकोष सहकारी संस्था ४२, मार्केटिंग सोसायटी, कृषी औद्योगिक सहकारी संघ, प्रक्रिया सहकारी संस्था, सुतगिरणी, साखर कारखाने व बीज प्रक्रिया सहकारी संस्था १, नागरी सहकारी बँका, नागरी सहकारी पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था व पगारदार नोकरांच्या सहकारी पतसंस्था ११, मजूर, वीटभट्टी, औद्योगिक कामगार, औद्योगिक विणकर, ग्रामीण कारागीर व प्रिंटिंग प्रेस सहकारी संस्था ९, मत्स्य, कुक्कुटपालन, मेंढपाळ, हौसिंग, ग्राहक, दुग्ध सहकारी संस्था, औद्योगिक इस्टेट व बँकेशी संलग्न इतर सहकारी संस्था ३ असे एकूण ६६ मतदारापैकी ६६ मतदारांनी शंभर टक्के मतदान केले आहे.

१६ नोव्हेंबर सोमवारी होणाऱ्या निवडणुकीच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून या निकालातून चाकूर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय ताकदीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, यापेक्षा त्यातून तालुक्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याबाबत उत्सुकता अधिक आहे. त्यामुळे डीसीसी बँकेची ही निवडणूक चाकूरच्या राजकारणाला नवे वळण देणारी ठरणार का, याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.

यावेळी मतदान केंद्राध्यक्ष विजयकुमार बोरफळकर यांच्यासोबत सुखलाल शेख, बालाजी इंगळे,संदेश ढाकणे, राजरत्न शृंगारे,विष्णू जगताप, भैय्यासाहेब शितोळे,दत्ता तेलंग यांनी काम पाहिले. दरम्यान चाकूर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT